जीवनमुक्त
अध्याय पाचवा
आपली संत मंडळी दयेचे सागर असतात. त्यांना सर्व प्राणीमात्रात वसलेला ईश्वर स्पष्ट दिसत असतो व त्यांना स्वत:तील ईश्वराची उपस्थितीही जाणवत असते. त्यामुळे ईश्वर ज्याप्रमाणे आपणा सर्वांची काळजी घेतो त्याप्रमाणे ते आपणा सर्वांची काळजी घेत असतात. सर्वांशी ते समबुद्धीने वागत असल्याने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते, ते निरपेक्षतेने करतात. कारण त्यांच्या मनात अमुक एक आपला तमुक एक परका असा विचार कधीच येत नसतो. सामान्य माणूस समोर आलेल्या माणसाचा आपल्याला ह्याचा किती उपयोग आहे ह्यावर विचार करून त्याच्याशी कसे वागायचे हे ठरवत असतो. पण सर्वत्र ईश्वर पाहणाऱ्या संतांचे वर्तन मात्र सदासर्वदा सर्वांचे समाधान करणारेच असते आणि म्हणूनच ते ईश्वरालाही वंद्य होतात.
पुढील श्लोकात बाप्पा सांगतात, सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी जो मला पाहत असतो तो अविकारी असल्याने श्रेष्ठ योगी असतो. तो माझ्या आश्रयाला आला असल्याने जीवनमुक्त असतो.
जीवन्मुक्तऽ स योगीन्द्रऽ केवलं मयि संगतऽ । ब्रह्मादीनां च देवानां स वद्यऽ स्याज्जगत्रये ।। 18 ।।
अर्थ- जो प्राणिमात्राला व सर्वव्यापी मला स्वत:च्या समान जाणतो, तो योगींद्र जीवन्मुक्त होय. केवल माझे ठिकाणी रममाण झाल्याने, त्रैलोक्यामध्ये ब्रह्मादि देवांना तो वंद्य होतो.
विवरण- येथे बाप्पा योग्याच्या जीवनमुक्त अवस्थेचा उल्लेख करतात. त्याबद्दल सांगण्याचे विशेष म्हणजे, त्याचे सर्व व्यापार, व्यवहारामध्ये ज्ञानावस्था, सार्वत्रिकता, निष्काम वृत्ती, आनंद आणि शांती, त्रिगुणातीत अवस्था, ह्याचा अनुभव येतो. आपण ब्रह्माशी एकरूप आहोत ह्याची त्याला सदैव जाणीव असते. ही ब्राह्मी स्थिती होय. त्यामुळे सर्व लोकांशी तो समदृष्टीने व्यवहार करत असतो. त्याला सर्व विश्व हे त्याच्या घरासमान वाटत असते. त्यामुळे विश्वातील सर्व लोक त्याला त्याचे कुटुंबीय वाटत असतात. सर्वांशी तो आपुलकीने, प्रेमाने वागत असतो. ते कसेही वागले तरी तो त्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे कल्याण कशात आहे ह्यावर विचार करत असतो आणि त्याला अनुरूप कृती तो करतो. त्याला कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते. त्यामुळे तो सदैव आनंदी आणि समाधानी असतो. तो त्रिगुणातीत अवस्थेत असल्याने त्याचा स्वभाव स्थिर असतो. त्यामुळे निष्पक्षपती वृत्तीने सर्वांच्याकडे पाहू शकतो. तो जिवंतपणी मुक्तावस्थ अनुभवत असल्याने त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. तो स्वत:च्या मनाने काहीही करत नसून त्याला होणाऱ्या ईश्वरी प्रेरणेनुसार तो कार्य करत असतो. प्रारब्धानुसार त्याच्या वाट्याला आलेले भोग भोगून संपल्यावर तो शरीरबंधनातून मुक्त होतो. त्याच्या ह्या आदर्श आचारसरणीमुळे तो ब्रह्मादिकांनाही वंद्य होतो.
वरेण्य राजाने बाप्पांचं म्हणणं भक्तिभावाने ऐकून घेतलं पण मन अतिशय चंचल असल्याने त्याला हा अपूर्व योग साधणं अशक्य वाटत होतं म्हणून तो म्हणाला, द्विविधोऽपि हि योगोऽयमसंभाव्यो हि मे मतऽ।
ङयतोऽन्तऽकरणं दुष्टं चञ्चलं दुर्ग्रहं विभो ।। 19।।
अर्थ- हे विभो सर्वव्यापी ईश्वरा, ज्याअर्थी अंत:करण दुष्ट, चंचल व नियमन करण्यास कठिण आहे त्याअर्थी हा दोन्ही प्रकारचा योग आचरण करण्यास असंभाव्य आहे असे माझे मत आहे.
विवरण- वरेण्य राजाने सर्वसामान्य लोकांना भेडसावणारे मनाचे दुष्टपण व चांचल्य यांचा येथे उल्लेख केलेला आहे. बाप्पांचं विवेचन ऐकून आपणही असा योग साधण्याचा प्रयत्न करावा अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते पण मनाला आवर घालताना त्याची त्रेधातिरपीट उडते. राजानं मनाच्या दुष्टपणाचा अचूक उल्लेख केलेला आहे. सविस्तर पाहूयात पुढील भागात.
क्रमश: