For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दरीत पडलेल्या युवकाला जीवदान

12:11 PM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दरीत पडलेल्या युवकाला जीवदान
Advertisement

चिखले धबधबा पाहण्यासाठी गेले असता घडली घटना

Advertisement

खानापूर : खानापूर तालुक्याच्या पश्चिमेला गोवा-खानापूर हद्दीतील घनदाट जंगलात असलेल्या   चिखले धबधब्याच्या दरीत पडलेल्या बेळगाव- स्ट्रीट रोड  कॅम्पमधील युवकाला वाचविण्यात यश आले. चिखले येथील घनदाट जंगलात असलेला हा धबधबा पाहण्यासाठी बेळगाव- स्ट्रीट रोड पॅम्प येथील दर्शन, विनय आणि विनायक हे तिघे युवक सोमवार दि. 19 रोजी दुपारी अडीच वाजता गेले होते. त्यावेळी विनायक सुनील बुथुलकर (वय 20) हा युवक धबधब्याच्या वरच्या बाजूने दुचाकीवरून जाताना दुचाकीसह 100 फूट उंच कड्यावरून खाली दरीत कोसळला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी खानापूर पोलिसांना संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. जांबोटी येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन चिखले येथील ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. काही ग्रामस्थ या खोल दरीत उतरून विनायकला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. विनायक याच्या चेहऱ्याला व पायाला जखम झाली असून सुदैवाने तो बचावला आहे. खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांच्या मार्गदर्शनाखाली जांबोटी पोलीस उपकेंद्रातील जगदीश काद्रोळी, वासू पारसेकर व चिखले येथील संजय  पाटील व ग्रामस्थांनी बचावकार्यात सहकार्य केले आहे. विष्णू यशवंत पाटील, बाळू गावडे, राजू मडीवाळ, व्यंकटेश तेलंगा यांनी युवकाला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.चिखले हा गाव खानापूर तालुक्याच्या हद्दीतील असून या दरीतील खालील भाग हा गोवा हद्दीत येत असल्याने गोवा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. गोवा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Advertisement

बेळगावसह इतर भागातील युवक विनापरवाना येऊन येथे ट्रेकिंग करताना   मोबाईलवर शूटिंग करण्याचे धाडस करत आहेत. त्यामुळे असे जीवघेणे प्रसंग घडत आहेत. त्यामुळे वनविभागाने अशा पर्यटकांवर बंदी घातली असून वनविभागाच्या परवानगीशिवाय जंगलात प्रवेश करू नये. यामुळे जीवावर बेतल्यासारखे प्रसंग घडत आहेत. सुदैवाने या घटनेत मोठा अनर्थ टळला असून खानापूरच्या जंगलात कोणत्याही प्रकारचे धाडस न करण्याचे आवाहन वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.