For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कूपनलिकेत पडलेल्या बालकाला जीवदान

02:46 PM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
कूपनलिकेत पडलेल्या बालकाला जीवदान
Advertisement

विजापूरमधील इंडी तालुक्यातील घटना : 20 तासांचे अथक परिश्रम ठरले यशस्वी

Advertisement

वार्ताहर /विजापूर

विजापूरमधील इंडी तालुक्यातील लच्चयान येथे कूपनलिकेच्या उघड्या पाईपलाईनमध्ये 13 महिन्यांचे बालक पडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली होती. या घटनेची गांभीर्याने दखल घेताना बचाव पथकाच्यावतीने मदतकार्यालाही जलद सुरुवात करण्यात आली. तब्बल 20 तासांच्या अथक परिश्रमानंतर बालकास बाहेर काढण्यात यश आले. सात्विक मुजगोंडा असे बचावलेल्या बालकाचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, मुजगोंडा कुटुंबीयाची परिसरात चार एकर शेती आहे. लिंबू व द्राक्ष पिकाच्या संरक्षणासाठी त्यांनी बागेत कूपनलिका खोदली होती. बुधवारी सकाळी तेथे अर्धा इंच पाणी लागले होते. तेथे मोटार बसविण्याचे काम सुरू होते. यावेळी सात्विकचे वडील सतीश मुजगोंडा आणि आई  पूजा मुजगोंडा हे सात्विकसह तेथे उपस्थित होते. त्यावेळी अचानक सात्विक खेळत खेळत गायब झाला. त्याचा शोध घेतला, पण सापडला नाही. अखेर खोदलेल्या कूपनलिकेमध्येच तो पडल्याचे समजले. घटनेची माहिती तत्काळ पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्याने मदतकार्य सुरू झाले. पाईपमध्ये ऑक्सिजन पुरविला गेला. त्यानंतर जागेपासून सुमारे 10 फूट अंतरावर जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदण्यात आली.

Advertisement

इंडी तालुका रुग्णालयातील डॉ. एरन्ना धारवाडकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर आणि परिचारिकांच्या पथकाने सात्विकची पाईपलाईमधून तपासणी केली. जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी सखोल बचावकार्याची सूचना केली. आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली. गुरुवारी दुपारी बालकास बाहेर काढण्यात यश आले. जिल्हाधिकारी टी. भुबलन, एसपी ऋषिकेश  सोनवणे, जि. पं. सीईओ ऋषी आनंद, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दलाचे जवान, बेळगाव आणि कलबुर्गी येथील एसडीआरएफ, हैदराबाद येथील एनडीआरएफ कर्मचाऱ्यांनी केलेल्या सलग 20 तासांच्या प्रयत्नांना यश आले. इंडी तालुका रुग्णालयात प्राथमिक उपचारादरम्यान, लचना येथून बालकाला रुग्णवाहिकेतून इंडी तालुका रुग्णालयात नेण्यात आले. तेथील सीएमओ डॉ. एरण्णा धारवाड यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले.

Advertisement
Tags :

.