शनीच्या चंद्रावर जीवन ?
पृथ्वी सोडून अंतराळात अन्य कोणत्याही ग्रहावर जीवसृष्टी आहे की नाही, याचा शोध मानव गेल्या 100 वर्षांपासून घेत आहे. अद्याप त्याला यात निश्चित असे यश आलेले नाही. आज मानवाकडे पृथ्वीपासून लक्षावधी प्रकाशवर्षे दूर अंतरावर असणाऱ्या आकाशगंगांची, ताऱ्यांची, असंख्य ग्रहांची माहिती आहे. तथापि, कोठेही पृथ्वीवर आहे तशा जीवनाचा मागमूस लागलेला नाही.
मात्र, अलिकडच्या काळात यासंबंधी संशोधकांच्या आशेला पालवी फुटली आहे. आपल्याच सूर्यमालेतील शनी या ग्रहाच्या एका चंद्रावर प्रवाही पाणी असावे अशी शक्यता संशोधकांना वाटू लागली आहे. शनीचा हा चंद पूर्णत: हिमाच्छादित आहे. मात्र, हिमाच्या या आच्छादनाखाली मोठ्या प्रमाणात द्रवरुप पाणी असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एक महासागरच या जाड आच्छादनाच्या आत असावा, असा कयास आहे. तसे संकेत संशोधनातून मिळालेले आहेत.
हा महासागर 68 किलोमीटर खोल असावा. त्याच्या पृष्ठभागावर 24 किलोमीटर उंचीचे हिमाचे आच्छादन असावे. या महासागराच्या तळाचे तापमान जवळपास 10 डिग्री सेल्शियस, अर्थात बऱ्यापैकी ऊबदार असावे. तसे असल्यास तेथे सूक्ष्म स्वरुपातली जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. हा महासागर नेमका केव्हा निर्माण झाला, याचा शोध घेतला जात आहे. तो काही कोटी वर्षांपूर्वीच निर्माण झाला असेल तर जीवसृष्टी असण्याची शक्यता नाही. तथापि, तो एक 100 कोटी किंवा त्यापेक्षा जुना असेल तर जीवसृष्टीची शक्यता निश्चितपणे आहे, असे मत संशोधक व्यक्त करतात. यावर अधिक शोध घेतला जात आहे.