ज्याला अध्यात्माची आवड नाही त्याचे जगणे निरर्थक ठरते ।
अध्याय चौथा
‘नसे ज्ञान नसे श्रद्धा संशयी नासला पुरा । न हा लोक न तो लोक न पावे सुख संशयी ।’ हा श्लोक आपण सध्या पहात आहोत. त्यानुसार भगवंत म्हणतात, ज्या प्राण्याच्या अंत:करणात अध्यात्माची आवड नाही, त्याच्या जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? ती आवड निर्माण होण्यासाठी वाट्याला आलेली कर्मे निरपेक्षतेने करून ईश्वराला अर्पण केली तर शांतीरूप आत्मसुखाची चव चाखायला मिळेल. ती आणखीन आणखीन चाखायला मिळावी यादृष्टीने तुमच्यात अध्यात्माची आवड आपोआपच निर्माण होईल. जो असा प्रयत्न करणार नाही तो जगला काय आणि मेला काय सारखेच कारण त्याचा हा जन्म वाया गेल्यातच जमा असतो. माउली पुढे म्हणतात, एखाद्या रोग्याला अमृतही आवडत नाही, त्यावेळी त्याला निश्चित मरण आले आहे, असे समजावे. त्याप्रमाणे ज्याला अध्यात्माची आवड नाही त्याचे जगणे व्यर्थ होय. तो विषयसुखात रंगून गेलेला असतो, ऐहिक ज्ञानाने जो उन्मत्त होतो, संशयाच्या चक्रात सापडतो, यात शंका नाही.
अगदी वेदशास्त्र शिकलेले शास्त्राr पंडित देखील या शंकाचक्राची शिकार होतात. त्यांना असे वाटत असते की, मी ज्ञानी आणि पंडित असल्याने माझा उद्धार होणार हे निश्चित आहे. त्यांना त्यांच्या पुस्तकी ज्ञानाचा गर्व झालेला असतो. त्यामुळे त्यांना सद्गुऊ ईश्वर यांच्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागते. आपल्या पुस्तकी ज्ञानाच्या कैफात असल्याने जप केल्याने काय होणार आहे ? दान दिल्याने काय मिळणार आहे? कुणाला तरी फुकट जेवायला घालून कोणते पुण्य मिळणार आहे? असे विचार त्याच्या मनात सतत येत असतात. त्यामुळे त्याच्या हातून काहीच साध्य होत नाही. यावर माउली म्हणतात, अशा प्रकारे जो संशयाच्या चक्रात गुंतून जातो, त्याच्या जीवनाचा निश्चितपणे घात होतो. त्याच्या इच्छा अपेक्षांना अंत नसल्याने त्याला मन:शांती मिळत नाही. त्यामुळे त्याला सध्याच्या जीवनातील व मृत्युनंतर परलोकातील सुखे प्राप्त होत नाहीत. त्याला आपण करतोय तेच बरोबर आहे असे वाटत असते. संशयी मनुष्य एकप्रकारे मानसिक रुग्णच असतो. त्याला खरे खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित यामध्ये असलेला फरक तो ओळखू शकत नाही. जन्मापासून आंधळ्या असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे रात्र आणि दिवस कळत नाही, त्याप्रमाणे संशयात अडकलेल्या माणसाला काहीच पटत नाही. संतांच्या सांगण्यावर संशय घेण्यासारखे दुसरे मोठे पाप नाही कारण ते सर्वनाशाचे जाळे आहे. एवढ्याकरिता तू या संशयाचा त्याग कर. जेथे आत्मज्ञानाचा अभाव असतो, तेथेच हा संशय असतो. प्रारंभी त्याला जिंकावे. जेव्हा अज्ञानाचा गाढ अंधकार पसरलेला असतो, तेंव्हा हा संशय मनामध्ये वाढत जातो त्यामुळे परमेश्वरावरील परम श्रद्धेचा मार्ग बंद पडतो. संशय केवळ हृदय व्यापून राहतो, असे नाही तर तो बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यामुळे बुद्धीलाही चांगले, वाईट कळेनासे होते. त्यामुळे बुद्धी सदाचरण घडत नाही, ते घडण्यासाठी ईश्वरावर किंवा त्याचे सगुण रूप असलेल्या सद्गुरूंवर नितांत श्रद्धा असणे आवश्यक आहे. सद्गुऊ नेहमी आपल्या भल्याचंच सांगत असतात. ते सांगतायत ना मग ते बरोबरच आहे अशी भावना हवी. अशी भावना झालेला मनुष्य सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे कर्मयोगाचे आचरण करत असतो. त्याला कर्मबंधने बाधत नाहीत असे भगवंत पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्रमश: