मोदींच्या सभेत स्फोट घडविणऱ्यांना जन्मठेप
पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या सर्व 4 दोषींना पाटणा उच्च न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आहे. यापूर्वी या चारही गुन्हेगारांना कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. उच्च न्यायालयाने आता चारही दोषींची शिक्षा 30 वर्षांच्या कैदेत बदलली आहे.
27 ऑक्टोबर 2013 रोजी पाटणा येथील गांधी मैदानात मोदींच्या सभेदरम्यान साखळी स्फोट झाले होते. या प्रकरणाचा तपास 31 ऑक्टोबर 2013 रोजी एनआयएने स्वत:कडे घेतला होता. या प्रकरणातील गुन्हेगारांनी कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने बुधवारी दोषी इम्तियाज आलम, हैदर अली, नुमान अंसारी आणि मोजिबुल्ला अंसारी यांच्या मृत्युदंडाची शिक्षा कैदेत बदलली आहे. न्यायाधीश आशुतोष कुमार यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी पूर्ण केल्यावर निर्णय राखून ठेवला होता.
2013 मध्ये गांधी मैदानात भाजपकडून हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यादरम्यान एकूण 6 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये 6 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 89 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याकडे एनआयए चौकशीची मागणी केली होती.
एनआयएने या प्रकरणी सर्व आरोपींच्या विरोधात 2014 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी 187 जणांनी न्यायालयासमोर साक्ष दिली होती. त्यानंतर कनिष्ठ न्यायालयाने इम्तियाज आलम, हैदर अली, नुमान अंसारी आणि मोजिबुल्ला अंसारीला दोषी ठरवत मृत्युदंड ठोठावला होता. या शिक्षेला गुन्हेगारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ज्याप्रकरणी उच्च न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला आहे.