दगडाने ठेचून तरुणाचा खून करणाऱ्यास जन्मठेप
वडूज :
पूर्ववैमनस्यातून बुधावलेवाडी येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून करणाऱ्यास वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. बाळू गजानन बुधावले (वय 40, रा. बुधावलेवाडी ता. खटाव) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. बाळु बुधावले याने हिम्मत देवबा बुधावले (वय 28 वर्ष रा. बुधावलेवाडी पो. विसापूर) या युवकाचा दि. 24 एप्रिल 2020 रोजी 4:30 वाजता बुधावलेवाडी गावच्या हद्दीत खिंड नावाचे शिवारातील कोकाटे तलाव्याजवळ दगडाने ठेचून खून केला होता.
याबाबतच्या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी आपसात संगनमत करून बुधावलेवाडी गावचे हद्दीत खिंड नावचे शिवारात कोकाटे तलावाजवळ जाऊन सदर ठिकाणी हिम्मत देवबा बुधावले व नातेवाईक प्रकाश महादेव मदने असे मासे पकडण्यासाठी तलावामध्ये जाळे टाकून मयत हिम्मत हा पाण्यातून बाहेर येत असतानाच आरोपी बाळू गजानन बुधावले, संजय गजानन बुधवले, गजानन संभाजी बुधावले, अमित नानासो बुधावले, सुरज नाना बुधावले यांनी जुने भांडणाचे कारणावरून मयत हिम्मत यास धक्काबुक्की करून खाली पाडले व आरोपी सुरज नानासो बुधावले व संजय बुधावले यांनी साक्षीदार प्रकाश मदने यास दगड फेकून मारले व त्यास घटनास्थळावरून पळून जाण्यास भाग पाडले व त्यानंतर आरोपी बाळू गजानन बुधावले व अमित बुधावले यांनी मयत हिम्मत यास तलाव्याच्या पाण्यातून ओढून बाहेर काढून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जमिनीवर पाडले.
त्यावेळी आरोपी संजय बुधावले, गजानन बुधावले यांनी मयत हिम्मत याचे पाय धरले व आरोपी अमित बुधावले याने मयत हिम्मत याचे दोन्ही हात धरले त्यावेळी मयत हिम्मत मोठ्याने ओरडून मला सोडा, मला मारू नका असे म्हणत असताना आरोपी बाळू गजानन बुधावले यांनी मोठा दगड व सुरज बुधावले याने तेथे पडलेला लहान दगड उचलून मयत हिम्मत याचे डोकीत व तोंडावर मारला. त्याचवेळी आरोपी संजय बुधावले, गजानन बुधावले, अमित बुधावले यांनीही तेथे पडलेले दगड उचलून मयत हिम्मत याच्या अंगावर मारून त्यास जखमी करून त्याला निर्दयतेने, क्रूरतेने दगडाने ठेचून ठार मारले आहे. म्हणून वगैरे मजकुराचे खबरीवरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुह्यात स.पो.नि पुसेगाव व्ही. बी. घोडके यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवले तसेच वैद्यकीय पुरावे जमा केले व कसून तपास करून आरोपींविरुद्ध जिल्हा सत्र न्यायालय, वडुज येथे दोषारोपपत्र दाखल केले. वडूज येथील जिल्हा सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील अजित प्रताप कदम (साबळे) यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने 15 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी आरोपीला भा.द.वि.स कलम 302 अन्वये दोषी ठरवून आज दि.10/03/2025 रोजी बाळू गजानन बुधावले (रा. बुधावलेवाडी) याला भा.द.वि.स कलम 302 अन्वये जन्मठेप व 5000 रू दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
सदर खटला चालवणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, स.पो.नि. संदीप पोमन यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड पो.उप. नि. दत्तात्रय जाधव, म.पो.हवा. विजयालक्ष्मी दडस, पो. कॉ. सागर सजगणे, पो.कॉ. जयवंत शिंदे, पो. कॉ. अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.