प्रेमसंबंधाच्या वादातून प्रियकरानेच काढला काटा, प्रियसीच्या खूनप्रकरणी जन्मठेप
जयगडमध्ये 14 डिसेंबर 2020 रोजी घडला होता गुन्हा, सत्र न्यायालयाने दिला निकाल
रत्नागिरी : जयगड येथे प्रेमसंबंधातून महिलेचा खून केल्याप्रकरणी आरोपीला सत्र न्यायालयाने जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. मारुती राजाराम मोहिते (55, रा हातकणंगले, कोल्हापूर) असे आरोपीचे नाव आहे. 14 डिसेंबर 2020 रोजी जयगड येथील दीक्षा किरण मेस्त्री (32) हिचा मारुती मोहिते याने डोक्यात लोखंडी रॉड मारुन खून केला असा आरोप जयगड पोलिसांकडून ठेवण्यात आला होता.
रत्नागिरी सत्र न्यायाधीश एस़ एस़ गोसावी यांनी या खटल्याचा निकाल दिला तर सरकार पक्षाकडून अॅड पुष्पराज शेट्यो यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, आरोपी मारुती मोहिते हा जयगड येथे ट्रान्स्पोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. या कंपनीचे जयगड येथे अतिथीगृह असून त्याठिकाणी दीक्षा ही साफसफाईच्या कामासाठी येत होती.
अतिथीगृहात मारुती मोहिते याचे सतत येणे-जाणे असल्याने विवाहित असलेल्या दीक्षा हिच्यासोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. दरम्यान, दीक्षा ही अन्य कुणाच्या तरी मोटारसायकलवर बसून फिरते. तसेच मोबाईलवर बोलते असा संशय मारुती याला होता. या कारणावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता.
14 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दीक्षा व मारुती हे जयगड येथील अतिथीगृहाच्या खोली क्रमांक 4 मध्ये एकत्र आले होते. यावेळी दीक्षा हिच्या मोबाईलवर एक कॉल आला व ती मोबाईलवर बोलू लागली. दीक्षा ही मोबाईलवर कुणाशी तरी बोलत आहे ही बाब मारुती याला खटकली. रागाने संतप्त झालेल्या मारुती याने किचन ट्रॉलीचा लोखंडी रॉड दीक्षा हिच्या डोक्यात मारुन तिला गंभीर जखमी केले. तसेच खोली नंबर 4 चा दरवाजा बाहेरून लावून त्याठिकाणाहून पळ काढला.
कंपनीच्या खोलीमध्ये जखमी अवस्थेत आढळून आलेल्या दीक्षा हिला उपचारासाठी प्रथम ऊर्जा रुग्णालय जयगड येथे दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. 16 डिसेंबर रोजी 2020 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयगड पोलिसांनी आरोपी मारुती मोहिते याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला.
तसेच घटनेनंतर पसार झालेल्या मारुती याला अटक केली. गुह्याचा तपास जयगड पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी केला. खटल्यादरम्यान, एकूण 19 साक्षीदार सरकार पक्षाकडून तपासण्यात आले. न्यायालयापुढे पैरवी अधिकारी म्हणून जयगड पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अनंत जाधव, क्रांती पाटील, हवालदार वंदना लाड यांनी काम पाहिले. तसेच सरकार पक्षाला अॅड श्रुती शेट्यो यांनी सहाय्य केले.