जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील जनजीवन विस्कळीत
म्हसवड, वडूज, फलटण :
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी दुष्काळी तालुके असणाऱ्या माण, खटाव आणि फलटणमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. फलटणला सलग तीन दिवस अतिवृष्टीची नोंद झाली आहे. माण आणि खटावमध्येही पावसाचा जोर जास्त असल्याने माणगंगा, बाणगंगा, येरळा नदीसह ओढे, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. म्हसवडमध्ये नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. तस श्री. सिद्धनाथ मंदिराच्या पायरीला पाणी लागले आहे. यात्रा पटांगणही पाण्यात गेले आहे. फलटणमध्ये बाणगंगेच्या पुराने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने नुकसानग्रस्तांना मदतीचे आदेश दिले आहेत. डिझास्टर फोर्सचे पथक फलटणला तैनात राहणार आहे. शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- माणगंगेला उगमापासून टोकापर्यंत पूर
पावसाने माणगंगा नदीला अनेक वर्षांतून पूर आल्याने नदीने उगमस्थानापासून शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे कुळकजाईपासून म्हसवडपर्यंत रौद्ररुप धारण केल्याने नदीवरील कोल्हापूर पध्दतीने बंधारे, इतर बंधारे भरुन वाहात आहेत. त्यावरील 15 पूल पाण्याखाली गेले असून अनेक पूल, रस्ते वाहून गेले आहेत. म्हसवडमध्ये माणगंगेचे पाणी पात्रातून बाहेर पडत बायपास रोड, यात्रा पटांगण, स्मशानभूमी, पुलावरुन गेले आहे. नदीलगत विश्रामगृहाशेजारील बंधाऱ्याजवळ राहणाऱ्या जाधव कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलवले तर पळशी येथील 15 लोकांना हलवण्यात आले आहे.
माणगंगा नदीवर कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यानजीक विश्रामगृहाच्या बाजूला नदी पलीकडील बाजूस चार घरांना पुराने वेढले होते. प्रशासक डॉ. सचिन माने, प्रांत गाडेकर, तहसीलदार सचिन आहेर, नायब तहसीलदार बाबर, सपोनि अक्षय सोनवणे, तलाठी सातपुते, सागर सरतापे, विजय ढेंबरे, वैभव लावंड, गणेश चव्हाण, शरद वाघमारे, संतोष सरतापे आदींनी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना रस्सी बांधून बंधाऱ्या पलिकडे अडकलेल्या 5 पुरुष, 4 महिला व 4 लहान मुलांना पाण्याच्या बाहेर काढून सिद्धनाथ हायस्कूल याठिकाणी ठेवले. त्यांची जनावरे मात्र त्याच ठिकाणी ठेवण्यात आली. एका व्यक्तीला चालता येत नसल्याने त्याला खांद्यावर बसवून पाण्याबाहेर काढण्यात आले. माण तालुक्यातील पूरस्थितीतील हे पहिलेच रेस्क्यू ऑपरेशन ठरले.
माण तालुक्यात 15 पुलांवरून पाणी वाहिल्याने अनेक गावांचा संपूर्ण तुटला आहे. दोन दिवसापासून दहिवडी आगाराने या मार्गांवर बस सेवा बंद ठेवली आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रब्बी हंगामातील पेरणी या पावसामुळे लांबणीवर पडल्याने दुहेरी संकटात माणचा बळीराजा सापडला आहे. माण तालुक्यात नगदी पैशांचे पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. कांदा, आंबा, मकवान ही पिके पाण्यात गेली आहेत. माणगंगा नदीने रविवारी उग्र रूप धारण करत बायपास रोड, यात्रा पटांगण, स्मशानभूमी, विरकरवाडी पुलावर पुराचे पाणी आले असून रथगृहाला पुराच्या पाण्याने वेढा टाकला आहे. तर पुराच्या पाण्याने श्री सिध्दनाथ मंदिराच्या पाठिमागील पायरीला अनेक वर्षानंतर जलाभिषेक घातला आहे.
तालुक्यात बिजवडी, पांगरी, राजवडी, तोंडले, आंधळी, परकंदी, मलवडी, कासारवाडी, शिरवली, वारूगड, कुळकजाई, पाणवन, शिरवली, बिदाल, पुळकोटी, वळई, विरळी कुळकजाई, शिंगणापूर, मार्डी, मोही, कुकुडवाड गोंदवले आदी गावांनाही पावसाने झोडपून काढले आहे. टोमॅटो, आंबा, भुईमूग, कडवळ, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे सुरू केले असून पिके पाण्यात असल्याने पंचनामे करण्यात अडथळा येत आहे. पाणी निघाल्यानंतर पंचनामे करावेत, असे मागणी केली जात आहे.
- पालिकेच्या स्पीकरवरून नागरिकांना सूचना
गेले दोन दिवसांपासून प्रशासनाच्या वतीने पुराबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत होते. म्हसवड पालिका कर्मचारी गणेश म्हेत्रे यांनी स्पीकरवरुन लोकांना नदी पात्रात न जाण्याचे तसेच नदीपात्रातील रस्त्याचा वापर करून नये, असे आवाहन केले. रात्री 10 नंतर पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढून यात्रा पटांगण, गार्डन बायपास रोडवर पाणी आल्याच्या सूचनाही म्हेत्रे स्पीकरवरुन वेळोवेळी देत होते. त्यामुळे लोकांना पुराच्या पाण्याची माहिती मिळाली.
- खटावमध्ये जुने पूल पाण्याखाली
मान्सुनपूर्व पावसाच्या तडाख्याने खटाव तालुक्यात ओढे, नदी, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. परिसरातील जुने पूल पाण्याखाली असून संततधार पावसाच्या हाहाकारामुळे शेती मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराचे जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यामुळे बस झाले पुरे..आता थांब रे बाबा असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.तालुक्याची जलदायिनी ठरलेल्या येरळा नदीला पूर आला आहे.
खटाव तालुक्याच्या पूर्व - उत्तर भागात सलग चार दिवस पावसाने झोडपून काढले. मोळ, मांजरवाडी, बुध, डिस्कळ, पुसेगाव, खटाव, वडूजसह अनेक ठिकाणी शेती पिकांचे आणि काही ठिकाणी रहात्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. खातगूण, कटगुण परिसरात ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे पुसेगाव - वडूज रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. ब्रिटीशकालीन नेर तलाव ओसंडून वाहिल्याने माण तालुक्यातील आंधळी धरणही पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहत आहे. येरळा नदीला आलेल्या पुरामुळे वडूज नगरपंचायत सतर्क झाली असून शहरातून अग्निशमन दलाच्या गाडीतून सूचनाही देण्यात येत आहेत. तर येरळा नदीकाठी प्रशासनाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत. येरळा तलाव 60 टक्के भरला असून अशीच संततधार राहिली तर दोन ते तीन दिवसात येरळा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.
- फलटणमध्ये प्रशासन अॅक्शन मोडवर
फलटण शहर व तालुक्याला पावसाने झोडपल्याने अनेक घरे, शेती पिके, रस्ते व अन्य सार्वजनिक ठिकाणांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर फलटण प्रशासन व विविध राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते अॅक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यात 346 मि.मी. पाऊस पडला असल्याची नोंद झाली असून अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शनिनगर, मलठण, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, शिवाजीनगर व अन्य परिसरातील गटारे तुंबल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोमवारी प्रांताधिकारी सौ. आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार सचिन कांबळे-पाटील, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत घरांचे व शेती पिकांचे पंचनामे तात्काळ करावेत, नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत मिळावी, रस्त्यांची दुरूस्ती करावी, नैसर्गिक आपत्तीमधून तालुक्यातील जनतेला सुखरुप बाहेर काढणारी यंत्रणा युध्दपातळीवर राबवणे यावर चर्चा झाली. पावसामुळे व नुकसानीमुळे कोणत्याही नागरिकाची अडचण होणार नाही. त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन बैठकीत दिले.
- 26 मे 2025 सकाळी 10 पर्यंत पावसाची नोंद मि. मी. मधे
सातारा - 16.1, जावली-मेढा - 25.2, पाटण - 24.2, कराड-16.0, कोरेगाव-21.7, खटाव, वडूज- 58.3, माण, दहिवडी- 55.2, फलटण-96.6, खंडाळा-41.9, वाई-26.3, महाबळेश्वर-20.7.