नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने निलंबित : अभिषेक
‘रेंट अ कॅब’ व्यावसायिकांना वाहतूक संचालकांकडून इशारा
पणजी : राज्यातील विमानतळ, रेल्वेस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी रेंट अ कॅब व्यावसायिकांकडून नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील, असा इशारा वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक यांनी रेंट अ कॅबवाल्यांना दिला आहे. अभिषेक यांनी सांगितले की, रेंट अ कॅब योजनेनुसार या व्यावसायिकांनी अटी व निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. तरीही याचे पालन न होता उल्लंघन होताना दिसत आहे. कलम 8 (2) नुसार व्यवसायाचे ठिकाण पूर्वपरवानगीशिवाय बदलता येत नाही. तरीही काही रेंट अ कॅब व्यावसायिकांकडून त्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. यापुढे असे उल्लंघन झाल्यास थेट परवाने निलंबित केले जातील, असेही ते म्हणाले. परवानगी नसताना विमानतळाच्या ठिकाणी किंवा रेल्वेस्थानक परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय करताना रेंट अ कॅबवाले आढळल्यास त्यांचा परवाना निलंबित किंवा कायमचा रद्द करण्यात येईल. अभिषेक यांनी रेंट अ कॅब व्यावसायिकांना पाठवलेल्या नोटिसीचे अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी स्वागत केले आहे.
बड्या व्यावसायिकांचे वर्चस्व
राज्यात सुमारे 8 हजार रेंट अ कॅब असल्याची नोंद आहे. परंतु या व्यवसायावर केवळ दहा ते बारा मोठ्या व्यावसायिकांचेच वर्चस्व असल्याचे दिसून येते. वास्तविक रेंट अ कॅब व्यावसायिकांनी नियमानुसार आपल्या निश्चित ठिकाणाहूनच ग्राहक मिळवणे आवश्यक आहे. परंतु अनेक रेंट अ कॅब व्यावसायिक विमानतळ, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी ग्राहकांना मिळविण्यासाठी नियमांचे उल्लंघन करतात. या प्रकारामुळे टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांचा व्यवसाय होत नाही.