For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट सोसायटीची परवानगी रद्द

12:35 PM Feb 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिरुमल्ला तिरुपती क्रेडिट सोसायटीची परवानगी रद्द
Advertisement

आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेण्याचा सल्ला

Advertisement

पणजी : सहकारी संस्थांच्या निबंधक कार्यालयाने तिऊमल्ला तिरुपती मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडला 31 जुलै 2014 आणि 28 जून 2018 च्या पत्रांद्वारे त्यांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि गोवा राज्यात 13 शाखा उघडण्यासाठी दिलेली परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) गोवा सरकारने तात्काळ रद्द केले असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय सहकारी संस्था निबंधकांनी 24 मे 2013 रोजी जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे मल्टि स्टेट सहकारी संस्था कायदा, 2002 च्या कलम 108 नुसार, त्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात कार्यरत असलेल्या मल्टि स्टेट सहकारी संस्थांच्या तपासणीसाठी राज्य निबंधकांना देण्यात आलेल्या अधिकारानुसार, गोव्यातील सहकारी संस्था निबंधक कार्यालयाने केलेल्या नियामक छाननी आणि तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तपासणी आणि त्यानंतरच्या कार्यवाहींमध्ये कायदेशीर आवश्यकता आणि नियामक निर्देशांचे पालन न करणे आढळून आले, कायद्यानुसार लेखा आर्थिक विवरणपत्र सादर न करणे, तपासणी आणि पडताळणी प्रक्रियांमध्ये सहकार्य न करणे, ज्या अटी आणि शर्तींच्या अधीन एनओसी देण्यात आली होती त्यांचे उल्लंघन करणे आणि नोटीस बजावल्यानंतरही सहकारी संस्थांच्या निबंधकांना प्रतिसाद न देणे किंवा त्यांच्यासमोर हजर न होणे अशा कारणांसाठी एनओसी रद्द करण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला सल्ला देण्यात आला आहे,  की त्यांनी संस्थेच्या नियामक स्थितीची नोंद घ्यावी आणि वरील संस्थेसोबत कोणताही आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना योग्य ती काळजी आणि सावधगिरी बाळगावी. सदर संस्थेच्या संदर्भात कोणतीही तक्रार, वाद किंवा स्पष्टीकरण असल्यास संबंधित व्यक्ती कायद्यानुसार योग्य सक्षम अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतात, असेही कळविण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.