लिबिया लोबो सरदेसाई यांना पद्मश्री
100 व्या वर्षीही गोव्यासाठी ठरल्या प्रेरणादायी
प्रतिनिधी/ पणजी
गोव्याच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. लिबिया लोबो सरदेसाई यांना प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने गोव्यासाठी ही गौरवास्पद गोष्ट ठरली आहे.
पणजी चर्च स्क्वेअर परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. लिबिया लोबो यांचा सामाजिक चळवळीतही मोठा वाटा आहे. गोवा मुक्ती लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावताना धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून त्या ओळखल्या जातात.
गोवा मुक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक म्हणून वयाच्या 100 व्या वर्षीही अॅड. लिबिया लोबो सरदेसाई ओळखल्या जातात. 1955 मध्ये त्यांनी भूमिगत रेडिओ स्टेशन र्न्न्दै अ थ्ग्ंाrdadा सुरू केले आणि भारतीय सैन्याला पारेषण केंद्रे उभारण्यात मदत करून स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. गोवा मुक्तीनंतरही त्यांनी सेवा सुरूच ठेवली असून, गोव्याच्या न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला वकील म्हणून त्या ओळखल्या जातात.
लिबिया लोबो सरदेसाई यांच्या नावाची पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान : मुख्यमंत्री
गोव्याच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अॅड. लिबिया लोबो सरदेसाई या भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान म्हणून नक्कीच अग्रस्थानी आहेत. लिबिया लोबो सरदेसाई यांनी गोवा मुक्तीसाठी घेतलेले कष्ट आणि दाखवलेले धैर्य याची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. अॅड. लिबिया लोबो सरदेसाई या गोव्यासाठी भूषणावह व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांचा आदर्श भावी पिढ्यांनी घ्यायला हवा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.