अलमट्टीसंबंधी दोन दिवसांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती
बेंगळूर : अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यासंबंधी आक्षेप घेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या पत्राला आमचे मुख्यमंत्री प्रत्युत्तर देतील. दोन दिवसांत सिद्धरामय्या पत्र पाठविणार आहेत. त्यानंतर याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान आणि केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांच्या भेटीसाठी वेळ मागण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. बेंगळूरच्या सुम्मनहळ्ळी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अलमट्टी जलाशयासंबंधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे मुख्यमंत्री पुढील दोन दिवसांत पत्र पाठवतील. सिद्धरामय्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविणाऱ्या पत्राची प्रत राज्यातील सर्व खासदारांना पोहोचविण्यात येईल. त्यानंतर याविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय जलशक्ती खात्याच्या मंत्र्यांच्या भेटीसाठी तारीख निश्चित करण्याची विनंती करेन, असे त्यांनी सांगितले.