सिद्धरामय्यांच्या समर्थकांकडून म्हैसुरात पत्र चळवळ
बेंगळूर : राज्य राजकारणात ‘नोव्हेंबर क्रांती’, नेतृत्त्व बदल आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली आहे. आता म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्या समर्थकांनी सिद्धरामय्या यांना पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री घोषित करावे, अशी मागणी केली आहे. अल्पसंख्याक, मागसवर्ग आणि दलित (अहिंद) समुदायाच्या संघटनांनी ‘पत्र चळवळ’ सुरू केली. म्हैसूरमधील रामस्वामी सर्कलमध्ये अहिंद समुदायाच्या कार्यकर्त्यांनी ही पत्र चळवळ सुरू केली असून नेतृत्त्व बदलाबाबत असणारा गोंधळ दूर करावा. पुढील मुख्यमंत्री कोण असेल, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत कोण आहेत, याविषयी गोंधळ असून त्याकडे लक्ष केंद्रित करावे. तसेच सिद्धरामय्या यांनाच पूर्ण कालावधीसाठी मुख्यमंत्री म्हणून घोषित करावे, अशी मागणी काँग्रेस वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.