हे न्यायदेवते ,सर्वसामान्यांनी आता न्यायासाठी कुणाकडे पहावे ?
७ / ११ बॉम्बस्फोट प्रकरणावरील निकालानंतर एका व्यथित नागरिकाचे पत्र
- मंगल नाईक -जोशी
हे न्यायदेवते,
तुला मनापासून अभिवादन. तुझ्याशी नम्रतेने, प्रेमानेच बोलायला हवे, हे आम्ही जाणतो. पण सुरुवातीलाच माफी मागतो. कारण आदरयुक्त भावनेने हक्काने लिहीत असलो तरीही आज या शब्दांना क्रोधाचे वलय आहे. आता पत्रातील कोणतीही औपचारिकता न करता मुद्द्याचे बोलतो. थेट तुझ्याशीच बोलणे उचित होईल, असे वाटले. म्हणूनच, हा पत्रप्रपंच ! कसे आहे, या लोकशाहीचा डोलारा सांभाळणाऱ्या व्यवस्थाच जेव्हा तुझ्या या सर्वसामान्य नागरिकांसमोर प्रश्न उभ्या करतात नं, तेव्हा त्याची उत्तरे मागावीत कुणाकडे, हेच कळत नाही. हे माते, तू भूत-वर्तमान-भविष्य सारे जाणतेस. या मृत्युलोकात जगणारी आम्ही माणसे क्षणाक्षणाला मृत्युच्या सावटाखालीच जगत असतो. आत्ता श्वास सुरू आहे. पुढच्या क्षणी काय होईल, हे आम्हाला ठावूक नसते. प्रत्येक माणसाला मृत्यू आहेच, हे सत्य असले तरीही कोणत्याही माणसाचा अकाली मृत्यू किती दुःखद असतो, हे फक्त त्याचे कुटुंबीयच सांगू शकतात. खांद्यावर जबाबदाऱ्या असणारा कर्ता माणूस मध्येच उठून गेला तर त्याचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त होते. हे मी का सांगत असेन ? सन २००६ मध्ये ११ जुलैला आमच्या राजधानीत मुंबईत घडलेल्या घटनेचे स्मरण कर. आज आम्ही माणसे 'मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट' म्हणून ही घटना ओळखतो. त्यादिवशी संध्याकाळी अवघ्या ११ मिनिटात 'मुंबईची जीवनवाहिनी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यात १८९ लोकांचे प्राण गेले. तर या संख्येच्या आठ ते दहापट माणसे जखमी झाली. शेकडो नव्हे अधिकच कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्यावेळी सगळ्या देशभरातून उसळलेला जनक्षोभ, डोळ्यांमध्ये पेटलेले संतापाचे विखार तू पाहिलेस. हे आम्ही वेगळे काय सांगायला हवे, माते? त्याक्षणी बॉम्ब ठेवणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी प्रत्येक माणूस टाहो फोडून करीत होता. ते रास्तच होते नं? या संध्याकाळच्या लोकलमधून हातावर पोट असणारी कर्ती माणसे प्रवास करतात. ती जीवाची मुंबई करण्यासाठी आलेली नसतात. 'सर्वसामान्य माणसे' म्हणजे देशाच्या कायद्यास मान देऊन नीतीमुल्ये जपणारा,आपापल्या क्षेत्रात दिवसरात्र काम करून, देशाच्या एकूण उत्पादनातील वाढीसाठी हातभार लावणारा एक मोठा वर्ग असतो. दुर्दैवाने दहशतवादी आणि सर्वच मोठ्या गटांसाठी सर्वसामान्य म्हणजे केवळ वेठीस धरता येऊ शकणारी माणसे असतात. क्षमस्व आहे. पण हा निकाल ऐकून याच सर्वसामान्यांच्या डोळ्यांचे काठ अश्रुंनी डबडबले !बॉम्बस्फोटानंतर आता १९-२० वर्षाच्या दीर्घ काळानंतर एवढा गंभीर गुन्हा केल्याचा आरोप असणारी माणसे निर्दोष सुटावीत ? सगळे आरोपी निर्दोष! ज्या निरपराध माणसांचे बळी गेले, ज्यांचे अवयव जाऊन कायमचे अपंगत्व आले, अशा माणसांनी न्यायासाठी आता कुणाकडे पहावे? निकाल विरोधात गेला. तो का ? कसा ? या त्यांच्या स्वाभाविक साध्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी कुणाकडे मागावीत? मुंबई उच्च न्यायालयात सगळे आरोपी निर्दोष सुटले. विशेष सत्र न्यायालयाने या १२ पैकी ५ जणांना फाशीची शिक्षा व उर्वरीत आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने तो निकाल रद्द करून ज्यांच्यावर याव्यतिरिक्त आणखी कुठला खटला नसेल, अशा सर्वांची तातडीने सुटका करण्याचे आदेश दिलेत. हे न्यायदेवते, हे बारा आरोपी जर निर्दोष तर मग लोकलमध्ये बॉम्ब ठेवणारे ते कोण होते? इतकी वर्षे ते या समाजात उजळ माथ्याने, ताठ मानेने वावरत असतील का? जर हे पकडलेले १२ आरोपी गुन्हेगार नाहीत, तर आता १९ वर्षानंतर लोकलमध्ये कुकरमधून बॉम्ब ठेवणारे ते हात कसे शोधावेत? हे वास्तव किती गंभीर आणि भयावह आहे! ज्या कुणी माणसांनी बॉम्ब ठेवले, ती माणसे या निकालाने खूश असतील. कारण एकतर अजून ती तपास यंत्रणेच्या कचाट्यात आली नाहीत. आणि आली असतील तर ती निर्दोष ठरलीत. विजयाच्या उन्मादात हीच माणसे समाजात नवी कृत्ये करण्यास मोकळी झालीत. त्यांना वेसण घालणारे तुझ्याशिवाय कोण आहे? याबाबत ज्येष्ठ विशेष सरकारी वकील तथा राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम म्हणतात, यापूर्वी सत्र न्यायालयाने या खटल्यात ज्या पुराव्यावर विश्वास ठेवला, त्याच पुराव्यावर आता उच्च न्यायालयाने विश्वास न ठेवणे, यामध्ये काही विसंगती किंवा तफावत असू शकते. यात कायद्याचे विश्लेषण करण्यात चूक झाली की, तपासयंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता, याबाबत योग्य ‘पोस्टमार्टेम’ होईल. सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील करावे.याचा अर्थ आता या निकालाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे समजते. निदान तिथे तरी गुन्हे सिद्ध होऊन गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी. अन्यथा, या आमच्या भारतभुमीत गुन्हेगार असे प्रचंड गंभीर गुन्हे करून पुन्हा 'पांढरपेशे' म्हणून सभ्यता मिरवतील. सर्वसामान्य निरपराध माणसांचे मात्र बळी जात राहतील. हे बघ, ठोस सबळ पुराव्यावरच न्यायालय अंतिम निर्णय देते, हे मान्य. जर आम्ही पुरावे देण्यात कमी पडलो असू तर आता सक्षम पुरावे सादर करण्याचे सामर्थ्य आम्हाला दे. पुढे लढण्याचे बळ दे. या भारतभुमीवर अपराध्यांना शिक्षा व्हायला हवी. अन्यथा आमचा शेजारी सोकावेल. दहशतवादी संघटना बिनधास्त होतील. भारतात कोणताही गुन्हा करून निर्दोष सुटता येते, ही भावना वृद्धिंगत होईल. निष्पाप, निरपराध नागरिकांच्या मानगुटी चिरडून दहशत वाढविली जाईल. आम्हा सर्वसामान्यांना दिलासा देणारा आशेचा किरण फक्त तूच आहेस. असीम श्रध्देच्या पोषणमुल्यावरच आमची भारतीय मने पोसलेली आहेत. आम्ही सर्वसामान्य माणसे कायद्यावर विश्वास ठेवतो. कोणताही निर्णय चूक-बरोबर, योग्य-अयोग्य ठरविण्यासाठी आम्ही कायदेपंडित नाही. तुझ्या दरबारात पिडीत-वंचितांना त्यांचे हक्क, अन्याय-अत्याचारग्रस्तास न्याय, गुन्हेगारास शिक्षा आणि राज्यकर्त्यास समाजभान मिळावे, एवढीच आमची अपेक्षा असते. आमच्या विश्वासाला तू तडा जाऊ देणार नाहीस, याची खात्री आहे. माफ कर. हे पत्र लिहून लहान तोंडी मोठा घास घेतला. पण तुझ्याशिवाय आणखी कुणाकडे ही व्यथा मांडणार होतो! तुझ्या चरणी सविनय सादर करून पत्र आटोपते घेतो.
आभारी आहे.
कळावे.
तुझाच,
एक व्यथित नागरिक