म्हादई वाचवू, राज्यालाही हरित बनवू!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची ग्वाही : विधिकार दिन सोहळा साजरा
पणजी : राज्याचा विकास हा गोव्याच्या हितासाठी सूर आहे. काही माजी आमदार मला लेखी पत्रे पाठवून अनेक गोष्टी नजरेस आणून देतात. मी त्याची त्वरित दखल घेऊन या सूचना विचारात घेतो. प्रशासनाबद्दल किंवा कायदा सुव्यवस्था याविषयी कोणत्याही सूचना असल्यास किंवा राज्याच्या हिताच्यादृष्टीने काही उपाय सुचविल्यास आजी-माजी आमदारांनी त्या निदर्शनास आणून द्याव्यात. म्हादईचा प्रश्न जेवढा जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे, तेवढाच सरकारच्याही आहे. त्यामुळे म्हादई नदी वाचविण्यासाठी आणि गोव्याला हरित ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पर्वरी येथे विधानसभा संकुलाच्या सभागृहात आयोजित केलेल्या विधिकार दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विधिकार मंचचे पदाधिकारी माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस, सदानंद मळीक, मोहन आमशेकर, विधिमंडळ सचिव नम्रता उल्मन यांची उपस्थिती होती.
विधिकार दिन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या बहुतांश माजी आमदार व माजी खासदार यांनी म्हादईचा प्रश्न उपस्थित केला होता. कर्नाटकने पाणी वळवल्याने गोव्यावर भविष्यात पाण्याचे संकट येणार असल्याची चिंताही व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी म्हादईचा तिढा सोडविण्याबाबत सरकार कधीच नरमाईचा भूमिका घेणार नाही. सरकारने सुधारणांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली असून, राज्यातील सर्व विषय काळजीपूर्वक सोडविले जातील, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सभापती तवडकर यांनी स्वागतपर भाषणात विधिकार दिन सोहळ्याच्या उपस्थित सर्व आजी-माजी आमदार, माजी मंत्री यांना शुभेच्छा देऊन या विधिकार दिन सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमात अनेक माजी आमदारांनी आपली मते व्यक्त करून सरकार व आमदारांची भूमिका यावर जोर दिला. या कार्यक्रमात 1989 ते 1994 या सालात आमदार म्हणून राज्याची सेवा बजावण्यात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या आमदारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये व्हिक्टर बेन्जामिन गोन्साल्वीस, डॉ. कार्मेल फेगरादो, धर्मा चोडणकर, विनयकुमार उसगावकर, फेरल फुर्तादो, मोहन आमशेकर, डॉम्निक जोकीम फर्नांडिस, राधाराव ग्रासीयस, बाळकृष्ण प्रभू, माविन गुदिन्हो, चर्चिल आलेमाव आदींचा समावेश होता.
माजी आमदारांच्या मंचने मौन बाळगू नये : युरी आलेमाव
मला असे वाटते की, माजी आमदारांच्या मंचासमोर त्यांना पुन्हा एकदा ताजेतवाने करण्याची गरज आहे. कारण आपण सर्वजण कायदा करणारे, कायदा आणणारे आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे आहोत. आम्ही सर्व गोवा आणि गोवेकरांच्या हिताचा विचार करणारे आहोत. मनात कोणतेही क्षुद्र पक्षीय राजकारण नाही. तरीही जीवनवाहिनी म्हादईला धोका, मांडवी नदीचा मालक बनलेला कॅसिनो उद्योग आज धार्मिक, संत आणि आध्यात्मिक लोकांची भूमी म्हणून गोव्याची प्रतिमा खराब करत आहे. तरीही म्हादईची एक इंचही प्रगती होताना दिसत नाही. दुसरीकडे, तणाव आणि धमक्या वाढल्या आहेत. कॅसिनो उद्योग आणि संबंधित जुगार व्यवसायांना गोव्याची आर्थिक जीवनरेषा म्हणून पुढे केले जात असून, ही दु:खद परिस्थिती आहे. आज आपली अर्थव्यवस्था कॅसिनो प्रबळ किंवा अवलंबित आहे हे ऐकणे खरोखरच दयनीय आहे. जमिनीच्या ऊपांतरणाचा आजार जमीन बळकावणे आणि लँड बँकर्सना मोठ्या प्रमाणात जमिनी हस्तांतरित करण्याच्या धोक्यात बळावत चालला आहे. त्यामुळे गोव्याच्या या गंभीर प्रश्नावर माजी आमदारांच्या ह्या मंचने मौन बाळगू नये, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगत सरकारच्या धोरणावर टीकास्त्र सोडले.
विधिकार दिन सोहळ्यात ‘तरुण भारत’चे कौतुक
राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी ज्या पद्धतीने आजी-माजी आमदार कष्ट घेतात, प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने वृत्तपत्र म्हणून दै. ‘तरुण भारत’ने आपली जबाबदारी झटकलेली नाही. त्यांनी वेळोवेळी सरकारच्या चुकीच्या धोरणावर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून सूचना केलेल्या आहेत. प्रसंगी सरकारच्या कारभारावर ताशेरीही ओढले आहेत. आज विधिकार दिन सोहळ्याच्या निमित्ताने तरुण भारतने विशेष पान जनतेसमोर ठेवून राज्याला नेमक्या कोणत्या दिशेने घेऊन जायचे आहे, हे लेखणीतून मांडले आहे. तरुण भारतचे हे योगदान हे लोक प्रतिनिधींहून कमी नाही, असे गौरवोद्गार माजी आमदार मोहन आमशेकर यांनी विधिकार दिन सोहळ्यात काढले. बहुतांश आमदारांनी ‘तरुण भारत’वर कौतुकांचा वर्षाव केला.