उघडू संवादाच्या खिडक्या....!
सध्या सुट्टीचे दिवस आहेत. त्यामुळे भेटीगाठी सुरू आहेत. परवा आम्ही मैत्रिणी गार्डनमध्ये भेटणार होतो. मी त्यांची वाट पहात लॉनवरती बसले होते. बच्चे कंपनीचे खेळ, धमाल मस्ती अनुभवत होते. माझ्या अगदी जवळच्या एका बाकावर दोन मध्यमवयीन महिला बसल्या होत्या. अगदी खास मैत्रिणी आहेत हे त्यांच्या गप्पांमधून लक्षात येत होतं.
एक दुसरीला विचारत होती, ‘अगं आपण एक तास विविध विषयांवर चर्चा करतोय, मनमोकळ्या गप्पा मारतोय पण मध्येच तू अशी एकदम शांत का होतेस?कुठे हरवतेयस? काही बिनसलंय का?
कुठे नाही गं! तू येण्यापूर्वी अर्धा तास मी इथे आले. म्हणजे आता इथे येऊन दीड तास झाला बरोबर?
हो मग? ते पहा (थोड्या अंतरावर बसलेल्या एका विवाहित जोडप्याकडे तिने निर्देश केला) ते दोघे दिसतात का? हो. त्यांचं काय? परिचित आहेत का?
छे गं! मी दीड तास त्यांना पाहते आहे दोघांमध्ये संवादच नाही. दोघेही आपापल्या फोन मध्ये मशगूल आहेत. जेमतेम पाच-सहा वाक्य बोलले असतील-नसतील, गप्पा नाहीतच!
अगं हो! हो!.. पण तू का एवढी अस्वस्थ होतेस?
काय बोलू? अनेक ठिकाणी हेच पाहायला मिळतं. या पिढीचं कसं होणारे देव जाणे! माझ्या घरातलं चित्र डोळ्यासमोर आलं! माझी दोन नातवंडं शाळा, क्लास यामध्ये बिझी असतात. घरी आली की टीव्ही, टॅब, आयपॅड या विश्वात! त्यांचे आई-बाबा दिवसभर ऑफीसमध्ये व्यस्त! कुणालाच तसा निवांत वेळ नसतो म्हणा! मान्य आहे मला. परंतु निदान रात्री मोकळेपणाने संवाद साधत, एकत्र जेवणं.. दिवसभराच्या घडामोडी, गमती जमती, प्रश्न, समस्या एकमेकांसोबत शेअर केल्या हे नाहीच!
सकाळ झाली की पहिली नजर फोनकडे! व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टा यांच्या नादात सकाळचा नाश्ता समोर येतो कधी, पोटात जातो कसा, संपतो कसा हेही कळत नाही. एकमेकांजवळ मनमोकळं बोलणं, कौतुक करणं, प्रतिसाद देणे हा विषयच नाही! मोबाईलचा वापर करण्याला विरोध नाही गं! सुख सोयींचा लाभ घ्यावा, छान माहिती मिळते, जग जवळ आलंय हेही फायदे आहेत. त्यात दुमत नाहीच. पण याचा इतका अतिरेक झालाय की, या आभासी जगात रमता-रमता ‘प्रत्यक्ष संवाद’हरवत चाललाय!
संवादच नसेल, कुणी कुणाजवळ नीट व्यक्तच होणार नसेल तर नातेसंबंध टिकणार तरी कसे? सगळीच घुसमट! मग ताणतणाव, नकारात्मकता, नैराश्य हे आहेच. कठीण आहे सारं.
दोघींचा हा संवाद विचार करायला लावणारा होता. संवाद साधण्याची साधनं वाढली तरी ‘प्रत्यक्ष संवाद’ कमी होत चालल्याची जाणीव पावलोपावली होते. समुपदेशनाच्या क्षेत्रात काम करत असताना संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, दुरावणारी नाती हे सारं चित्र अनेकदा पाहायला मिळतं. खरंतर व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक सामाजिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी संवादाचे खूप महत्त्व आहे. आपले मनस्वास्थ्य घडविण्याचे वा बिघडविण्याचे सामर्थ्य संवादात असते. नातेसंबंधाची वीण घट्ट होते, नाते बहरते, फुलते ते संवादामुळेच! तर काही वेळा नातं तुटणं, गैरसमज, भांडण हे घडविण्याचे सामर्थ्यही त्यामध्ये असते. फक्त त्यावेळी त्याचे ‘विसंवादी रूप’ पाहायला मिळते. संवादाची सोपी व्याख्या अशी करता येईल, संवाद म्हणजे काय तर दोन व्यक्तींमधील बोलणे. संवादाच्या वेळी माहितीची, भावनांची, विचारांची, सूचनांची, आशयाची देवाण-घेवाण होत असते. संवादाच्या माध्यमातून एक व्यक्ती व्यक्त झाल्यावर दुसरी तिला अनुकूल व प्रतिकूल प्रतिसाद देते. जर भावनिक व वैचारिक पातळीवर अनुकूल प्रतिसाद मिळाला तर सुसंवाद होतो. प्रतिसाद प्रतिकूल असेल तर अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. संवादाचे महत्त्व सर्व स्तरावर आहे. परंतु नाते संबंधाबाबत बोलायचे झाले तर संवाद हा त्यातील अविभाज्य घटक आहे. कौटुंबिक वातावरण चांगले रहाण्यासाठी, नातेसंबंध सुदृढ राहण्यासाठी संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्या कुटुंबामध्ये ‘संवादांच्या खिडक्या’ एकमेकांसाठी खुल्या असतात तेथे वातावरण प्रसन्न राहते. परस्पर संबंध जिव्हाळ्याचे असतात. परस्परांचा आधार वाटतो. आपल्या समस्या, दु:ख, वेदना, उणीवा यावर एकमेकांसोबत चर्चा करताना, बोलताना संकोच वाटत नाही. अशा कुटुंबामध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने पोषक वातावरण असते. जीवनातील चढ-उतार, काही नकारात्मक विचार-भावनांवर मात करण्यासाठी एकमेकांचा आधार वाटतो. त्यातून बाहेर पडायला मदत होते.
मतमतांतरे असली तरी त्याचा स्वीकारही सहज असतो. आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, इंटरनेट या साऱ्यामुळे जग जवळ आलं. अगदी कुठेही दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांजवळ, मित्र-मैत्रिणी जवळ संपर्क साधणं खरंतर सोपं झालं. अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या. परंतु सातत्याने या आभासी जगात रममाण होण्याच्या वाढत्या कलामुळे ‘प्रत्यक्ष संवाद’, खळखळून हसणं हे सारं कमी होऊ लागलं. केवळ शहरातच नव्हे तर छोट्या गावातही हे चित्र पाहायला मिळतं. माणसांच्या गप्पांनी रंगलेले, फुललेले पार सुने-सुने होऊ लागले. काही ठिकाणी ते फुललेले दिसले तरी सगळे आपल्या मोबाईलमध्ये गर्क असल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळू लागले. स्मार्टफोन, व्हाट्सअप, फेसबुक इन्स्टा, प्रोफाइल पिक, स्टेटस, स्टोरी, लाईक, कमेंट, रील्स या वलयाभोवतीच अनेक जण रमू लागले.
माणसे स्मार्ट बनली खरी परंतु जगाशी अपडेट राहता-राहता कुटुंबामध्ये काय चाललंय याकडे मात्र अनेकांचे दुर्लक्ष होऊ लागलं. कुटुंबातील संवाद कमी होऊ लागला. कुटुंबाचे माय फॅमिली, स्वीट फॅमिली असे ग्रुपही फॉर्म झाले परंतु तरीही प्रत्यक्ष भरभरून बोलणं, मोकळा संवाद किती हा खरोखरच स्वत:ला विचारण्यासारखा प्रश्न आहे.
अर्थातच उपलब्ध सुख सुविधांचा वापर आपण कशा रीतीने करतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. खरंतर संवादामुळे विचारांची देवाण-घेवाण होते. एकमेकाजवळ व्यक्त होणे, ऐकुन घेणे गोष्टी घडतात. इतर गरजांप्रमाणे ‘संवाद ही मनाची मूलभूत गरज’ आहे. ज्यावेळी ‘भावनिक घुसमट’ होते त्यावेळी ‘संवादाची सपोर्ट सिस्टीमच’ मोलाची कामगिरी बजावते. मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी व्यक्त होणे आणि होऊ देणे हे फार महत्त्वाचे आहे.
सोशल मीडियाचा वापर, अपडेट राहणं ही काळाची गरज आहेच. परंतु सतत त्यामध्ये रमणं हे आत्मकेंद्रितता वाढवणारे आहे. या आभासी जगात रमताना ताण-तणाव, दु:ख, वेदना याचा निचरा झाला नाही तर पुढे जाऊन याच गोष्टी उग्र समस्येचे रूप धारण करतात. भावनांना वाट मिळाली नाही तर मनाच्या एका कोपऱ्यात हे सारं साठून राहतं आणि हळूहळू आपला प्रवास अस्वस्थतेच्या दिशेने व्हायला लागतो. ‘अस्वस्थतेचे ओझे’ टाळण्यासाठी गरज आहे ती माणसा-माणसातल्या संवादाची! एकाच घरात राहणारी माणसे, मग ते पती-पत्नी, पालक-मुले, भाऊ-बहीण, पिता-पुत्र नाते कोणतेही असो संवाद झालाच नाही तर गैरसमजाच वादळ नात्यांमध्ये दुरावा निर्माण करेल. संवादाच्या खिडक्या बंद केल्या तर घुसमट होणारच! या उलट संवादाच्या खिडक्या जाणीवपूर्वक उघड्या ठेवल्या तर एकमेकांना समजून घेणे, नकार देणं, नकार पचवणं, जीवनातले इतर चढउतार सहजतेने पार करणं शक्य होईल! विचार-भावना-वर्तन याचे सुयोग्य संघटन व्यक्तिमत्व संपन्न बनवेल. परस्परातील सुसंवाद मानसिक आरोग्य सुदृढ करेल आणि सकारात्मक दिशेने वाटचाल करण्यास प्रवृत्त करेल. संवादाच्या अभावामुळे दुरावणारी नाती तोच संवाद घट्ट करेल!
आज 31 डिसेंबर..2025 सालातील शेवटचा दिवस! उद्यापासून सुरू होत असलेल्या इंग्रजी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळे सज्ज झालोच आहोत. या वर्षी नात्यांची वीण घट्ट करूया, प्रत्यक्ष संवादासाठी पुढे होउया!
व्यक्त होऊया, समजून घेऊया आणि संवादाच्या खिडक्या उघड्या ठेवूया...चला तर मग आजपासून संकल्प करुया आणि हा संकल्प सिद्धीच्या दिशेने नेण्यासाठी सज्ज होऊया!!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!
अॅड. सुमेधा संजीव देसाई