जहाजबांधणीत देशाला जगज्जेता बनवूया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : मुंबईत भारतीय समुद्री सप्ताह परिषद
पणजी : जहाजबांधणी क्षेत्रात नवीन उंची गाठण्यासाठी भारत प्रयत्नांना गती देत असून नौवहन आणि जहाजबांधणी क्षेत्रासाठी तब्बल 2.2 लाख कोटी किंमतीचे उपक्रम मार्गी लावले आहेत. भारताला आता जलवाहतूक आणि जहाजबांधणी क्षेत्रातील अग्रक्रमी देश बनविण्याचे स्वप्न आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणुकदारांना भारतात या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईत नेस्को सेंटर गोरेगाव येथे आयोजित भारतीय सागरी सप्ताह 2025 मध्ये बुधवारी आयोजित ‘समुद्री नेते’ परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.
व्यासपीठावर त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर, कीर्तीवर्धन सिंग आदी मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील विविध मंत्री, तसेच जगभरातील 85 देशांमधील समुद्री क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी, गुंतवणुकदार, आंतराष्ट्रीय भागिदार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी स्मृतीचिन्ह आणि शाल अर्पण करून पंतप्रधानांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 12 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या किमान 600 सामंजस्य करार करण्यात आले.
भारतीय समुद्रीक्षेत्रात प्रचंड परिवर्तन
पुढे बोलताना, मोदी म्हणाले की 2016 मध्ये मुंबईतूनच भारतीय समुद्री सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला होता. आज दहा वर्षांनंतर भारताच्या समुद्रीक्षेत्रात प्रचंड परिवर्तन आले आहे. त्यातून भारताच्या समुद्रीसामर्थ्यावर संपूर्ण जगाचा विश्वास वाढू लागला आहे. त्यावरून हा महोत्सव आता जागतिक दर्जाचा बनला असल्याचे सध्याच्या उपस्थितीवरून सिद्ध होत आहे, असे ते म्हणाले.
सर्वाधिक रोजगार देणारा भारत तिसरा देश
या महोत्सवाने समन्वय आणि उर्जा या दोन्ही क्षेत्रांना पाठबळ दिले असून भारताने आता मोठ्या जहाजांना पायाभूत सुविधांच्या मालमत्तेचा दर्जा दिला आहे. दुसऱ्या बाजूने नाविक क्षेत्रातही भारताचा डंका वाजू लागला आहे. आज या क्षेत्रात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करणारा भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचे मोदी यांनी सांगितले.
भारत सहाव्या शतकापासून जहाजोद्यागात
खरे तर भारतासाठी समुद्री क्षेत्र हे नवीन नाही. येथे तब्बल सहाव्या शतकापासून जहाजोद्योग अस्तित्वात होता. संपूर्ण जगावर त्याचा डंका होता. परंतु मध्यंतरी आम्ही त्यात मागे पडत गेलो. तरीही दुसऱ्या बाजूने आम्ही जहाज तोडणी उद्योगात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनण्यापर्यंत मजल मारली. आता पुन्हा एकदा आम्ही जहाजबांधणीत जगज्जेता बनण्याचे प्रयत्न करत आहोत. त्यासाठी कल्पना, संशोधन आणि गुंतवणूक करणाऱ्यांनी पुढे येण्याची गरज आहे, असे आवाहन मोदी यांनी केले. प्रारंभी सोनोवाल यांनी स्वागतपर भाषणात भारतीय समुद्री सप्ताहाचा आढावा घेताना या क्षेत्रासाठी केंद्र सरकारच्या भविष्यातील योजनांची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलताना भारतीय समुद्री सप्ताहामुळे समुद्री क्षेत्रात जगभरासह भारतात होणारे बदल, संशोधन, विकास व त्याद्वारे होणारे फायदे यांची माहिती मिळू लागली आहे. त्यामुळे बड्या उद्योजकांना या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळू लागले आहे, असे सांगितले. हे सर्वकाही पंतप्रधानांची दूरदृष्टी, सामुद्रिक सामर्थ्याचा त्यांना झालेला साक्षात्कार, यामुळे शक्य होत आहे. त्यांच्याच प्रयत्नांमुळे भारताच्या संपूर्ण मरिटाईम उद्योगाला नवी दिशा प्राप्त होत आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांच्याच प्रयत्नांमुळे मरिटाईम क्षेत्रात भारताच्या शक्तीची जगाला ओळख होत आहे, असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.