चला, निसर्गाकडे पाहूया नम्रतेने
आज जागतिक पर्यावरण दिवस : केवळ घोषणा, जाहिरातबाजी नको,रोजच पर्यावरणाशी नाते जपूया, जीवनशैलीत बदल आवश्यक
पणजी : आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिचे संतुलन दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. तापमानवाढ, पावसाचे चक्र बिघडणे, दरवर्षी चक्रीवादळांची तीव्रता वाढणे, समुद्रपातळी वाढणे, ओसाड होणारी जंगले आणि दुर्मीळ होत चाललेली जैवविविधता ही केवळ वैज्ञानिक संशोधनातील आकडेवारी नव्हे, तर आता सामान्य माणसाचे रोजचे वास्तव झाले आहे. जगभरात 5 जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ औपचारिक झाडलावणीचा, पोस्टर स्पर्धा किंवा भित्तीचित्रांच्या कार्यक्रमाचा नाही, तर माणसाने निसर्गाकडे पुन्हा एकदा नम्रतेने पाहण्याचा आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी ठोस निर्णय घेण्याचा आहे.
गोव्यासारख्या लहान पण पर्यावरणदृष्ट्या अत्यंत समृद्ध राज्यासाठी हे आणखीच चिंताजनक आहे. गोवा हे भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असले तरी नैसर्गिक संपत्तीने नटलेले, जैवविविधतेने समृद्ध असे राज्य म्हणून ओळख आहे. समुद्रकिनारे, जंगल, नद्या, धबधबे, खारफुटीचे भाग, जैवविविधतेने परिपूर्ण पर्वतरांगा हे सर्व या राज्याचे नैसर्गिक वैभव आहे. मात्र, अलीकडच्या काळात वाढलेले शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी अनियंत्रित बांधकामे, पर्यटकांची वाढती संख्या, प्लास्टिकचा अतिरेक, आणि खाणकामाच्या नावाखाली होणारी वृक्षतोड या सगळ्यांमुळे गोव्यातील पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे.
केवळ घोषणा, जाहिरातबाजी नको
राज्य सरकारने अनेकवेळा पर्यावरण रक्षणासाठी धोरणांची घोषणा केली आहे. हरित गोवा अभियान, प्लास्टिकमुक्त मोहिमा, वन संवर्धन कार्यक्रम, जलस्रोतांचे पुनऊज्जीवन, शाश्वत पर्यटन विकास हे सगळे उपक्रम योग्य दिशेने टाकलेली पावले आहेत. मात्र, केवळ घोषणा आणि जाहिराती पुरेशा नाहीत. त्याची प्रभावी अंमलबजावणी हीच खरी गरज आहे. आजही अनेक ठिकाणी झाडांची तोड बिनधास्त सुरू आहे, नद्या गाळाने भरत चालल्या आहेत, आणि समुद्रकिनारी रसायनयुक्त कचरा टाकला जात आहे. पर्यावरण रक्षण हे केवळ सरकार किंवा पर्यावरणप्रेमी संस्था यांच्यावर सोपवून चालणार नाही. नागरिक म्हणून आपण सुद्धा आपल्या दैनंदिन सवयींमध्ये बदल घडवले पाहिजेत.
जीवनशैलीत बदल आवश्यक
पर्यावरणसंवर्धनासाठी प्रत्येक माणसाने स्वत:च्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. घराघरात कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापराचा आग्रह, प्लास्टिक टाळणे, पाण्याचा जपून वापर, शक्य असेल तिथे सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देणे हे छोटे पण प्रभावी बदल समाजात मोठा परिणाम घडवू शकतात. शाळा, महाविद्यालये, व्यापारी संस्था, स्थानिक संस्था यांनी एकत्र येऊन पर्यावरणविषयक जनजागृती वाढवणे गरजेचे आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात ‘निसर्ग माझा आहे, आणि त्याचे रक्षण ही माझी जबाबदारी’ ही भावना निर्माण होणे अत्यावश्यक आहे. ‘विकास’ हा शब्द आता पर्यावरणविना अपूर्ण मानला गेला पाहिजे. पर्यावरणाशी समन्वय साधून होणारा विकासच खरा ‘शाश्वत विकास’ ठरेल.
...तर निसर्गवैभव राहणार पुस्तकांपुरते
जगातील अनेक मोठ्या शहरांमध्ये हवामान बदलाचा मोठा फटका बसत आहे. पुर, उष्णतेची लाट, वनविवर, पाण्याची तीव्र टंचाई हे संकट आता केवळ दूरच्या प्रदेशांत नसून आपल्या दारात येऊन उभं ठाकले आहे. आपण जर आत्ताच सावध झालो नाही, तर भविष्यातील पिढ्यांसाठी जगणे कठीण होईल. गेल्या काही वर्षांत आपणच या निसर्गावर घाला घालतो आहोत. शासनाने धोरणे आखणे गरजेचे तर आहेच, पण नागरिकांनीही आपल्या सवयी बदलल्या नाहीत, तर हे वैभव केवळ पुस्तकांपुरते उरेल.
रोजच पर्यावरणाशी नाते जपूया
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वांनी संकल्प करायला हवा केवळ एका दिवसापुरती झाडे लावायची नाहीत, तर वर्षभर त्या झाडांची काळजी घ्यायची आहे. फक्त पर्यावरण दिनाचे भाषण करायचं नाही, तर प्रत्यक्ष कृती करायची आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे म्हणजे आपल्या जगण्याच्या हक्कासाठीच लढणे होय. पर्यावरण हाच खरा आपला वारसा आहे. फक्त 5 जूनला नाही, तर दररोज निसर्गाशी एक नातं जोपासणे हाच खरा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा मार्ग आहे. प्रत्यक्षात आज सर्वाधिक गरज आहे ती पर्यावरण रक्षणाविषयी खोलवर विचार करण्याची आणि दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची.