जगूया आनंदाने...
माझ्या परिचयातल्या माधवरावांसारखी काही माणसं तुम्हालाही परीचीत असतील!माधवरावांचे घर भौतिक सुख सोयींनी संपन्न आणि समृद्ध! अतिशय प्रेमळ, नीटनेटकी अशी पत्नी. दोन गुणी मुलं, हसतमुख वयोवृद्ध आई! पण माधवरावांना कधी प्रसन्न म्हणून पाहिले नाही. ते सदानकदा कातावलेले. बायको, मुलांवर, आईवर येता-जाता राग काढत असतात. ते घरी यायची वेळ झाली की घरचे सगळेच धास्तावलेले असतात आणि ते जेवढा वेळ घरी असतात तेवढा वेळ घरचे तणावाखालीच असतात कारण माधवराव म्हणजे ‘परफेक्शनिस्ट’..
भिंतीच्या कोपऱ्यात जळमट, फ्रीजला डाग, टेबलावर धूळ हे तर त्यांच्या घरात असणं ही अशक्य गोष्ट आहे. सोफ्याच्या खाली फरशीवर धुळ असणं, टीव्हीचं कव्हर वाकडे झालेले असणं, वर्तमानपत्राच्या घड्यावर-घड्यांची थप्पी अगदी बरोबर ठेवलेली नसणं, एक ना दोन.. अशातली एकही गोष्ट दिसली की माधवरावांचा पारा कमालीचा चढतोच आणि मग घरात वादंग सुरु होतो. घरातलं प्रत्येक माणूस सतत मानसिक तणावाखाली!
माधवरावांकडे घरकामाला कुणीही टिकत नाही आणि टिकलंच तर ती व्यक्ती सदानकदा धास्तावलेली आणि त्या धास्तावलेपणामुळे शंभर चुका करणारी! तसं पाहायला गेलं तर फार उशीर होण्यापूर्वी माधवरावांनी आपलं वागणं सुधारणं हे कुटुंबाच्या हिताचं नाही का? त्यांची पत्नी जुळवून घेते आहे. कदाचीत पुढेही जुळवून घेईल. पण मुलं मात्र मोठी झाल्यावर नक्कीच बंड पुकारतील. माधवरावांच्या अशा वागण्याने ते स्वत: तर थकतातच आणि बायको त्यांच्या धास्तीने सतत तणावाखाली रहात भराभर कामे उरकताना वैतागून, थकून जाते. मुलांना तर बाबा घरी नसतील तेव्हाच फक्त मोकळं वाटतं. घरात कधीही खेळकर, प्रसन्न वातावरण नसल्याने त्या मुलांनी मनाशी ठरवले आहे की मोठे झाल्यावर शक्य तितक्या लवकर घर सोडायचं.
आता मला सांगा, अशा वातावरणामध्येही नवरा बायको आणि मुलं आपापल्या कामांमध्ये जे यश मिळवत असतील त्याहून कितीतरी जास्त पटीनं यश घरातलं वातावरण पोषक असतं तर त्यांना मिळालं नसतं का? परफेक्शनिस्ट असण्याचा अट्टाहास इतका आवश्यक आहे का?
माझ्या परिचयातील नीलम.. तिला नेहमी असुरक्षित वाटत असतं. कुणाशी काही कारणाने तिचा काही वाद झाला तर मनातल्या मनात त्या व्यक्तीशी भांडत, तणतणत राहते. तोच विषय तिच्या डोक्यात तासन्-तास घोळत राहतो आणि अप्रिय, मनस्ताप होईल अशा विचारांचे दडपण घेऊन ती दु:खी होऊन बसते. जो काय वाद झाला असेल त्याबद्दल सरळ सरळ त्या व्यक्तीशी बोलून तो विषय तिने तिथल्या तिथे संपवून टाकला असता, घाबरून मनात कुठे चिडचिडत बसली नसती तर आज तिचे आयुष्य जास्त सोपं आणि सुखद झालं नसतं का?
रीमाचंही असंच काहीसं! खरंतर ती खूप गोड स्वभावाची, हौशी गृहिणी! अगदी प्रेमळ... मैत्रिणींना अगदी मनापासून मदत करणारी, सगळं कुटुंब मायेन सांभाळणारी. पण अगदी शुल्लक गोष्टही मनाला लावून घेते. आपण बोललो हे हिच्या मनाला लागले असेल याची बोलणाऱ्याला पुसटशीही कल्पना नसते. ही मात्र त्या बोलण्याने दुखावून, हिरमुसून बसते. बोलणं बंद करते. बरं अमुक माणूस असं बोललं त्याचं मला वाईट वाटलं असं सरळ सांगितलं तरीही काहीतरी उलगडा होणं शक्य आहे. पण न बोलता हिरमुसून बसल्यामुळे नातेसंबंधातला ओलावा, गोडवा आटत जातो आणि गैरसमजामुळे नाते कडवट होत जाते.
अशा लोकांच्या रुसव्या फुगव्याला घरातली सारे जण बिचकून असतात कारण केवढ्याशा कारणामुळे यांचा बिनसेल याचा काही भरवसा नसतो. हे खरं आहे की काही माणसं जास्त संवेदनशील असतात, हळवी असतात. परंतु या माणसांनीही लक्षात घ्यायला हवं की आपल्याच माणसांवर एवढ्या तेवढ्यावरून रुसण्यात रोजच्या आयुष्यातला वेळ वाया घालवत आहोत.
आतल्या आत कुढत बसून मनाशी गोष्टी घट्ट धरून ठेवणे हे स्वत:साठीच त्रासदायक ठरते. घरातले वातावरण तर बिघडतेच आणि आपले मानसिक आरोग्य धोक्यात येते आणि पर्यायाने शारीरिक आरोग्यही धोक्यात येऊ लागते.
सुरुवातीच्या उदाहरणातील माधवरावांचा शिस्तीचा आणि परफेक्शनिस्ट असण्याच्या अतिरेकामुळे घरातलं वातावरण सतत दबावाखाली असल्यासारखं होतं. एक लक्षात घेतलं पाहिजे की काही गोष्टीत आपण जास्त हुशार किंवा व्यवस्थितही आहोत हे शक्य आहे. परंतु प्रत्येकाची हुशारी ही वेगवेगळ्या प्रकारची असते जे एखाद्याला येत असेल त्यात आपल्याला अजिबात गम्य नसेल. केवळ तो अधिकाराने किंवा वयाने लहान आहे म्हणून त्याला कमी लेखणं हे ठीक नाही. प्रत्येक जण ज्या परिस्थितीत असेल त्यात शक्य तितक्या नीटपणानं काम उरकायचा प्रयत्न करत असतो. त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नसताना त्याचा निवाडा, शेरेबाजी आपण कशी काय करू शकतो? आता पहा.. आपल्या घरी कामाला येणारी बाई जर झोपडपट्टीतल्या एखाद्या खोलीत, आठ दहा माणसांच्या कुटुंबात राहत असेल तर आपली आणि तिची स्वच्छतेची कल्पना कशी बरं एक असेल? ती दररोज न चुकता कामाला येते हेच विशेष नाही का? आणि अगदी आर्थिक, सामाजिकदृष्ट्या समान असलेल्या दहा वेगवेगळ्या कुटुंबांच्या राहणीत, विचारसरणीमध्ये पुष्कळ फरक असू शकतो. अशा फरकांचा स्वीकार करायला आपण शिकले पाहिजे. सगळ्यांचीच राहणी आणि विचारसरणी अगदी सारखी असली तर जग किती कंटाळून जाईल?
सगळ्यात वैविध्य आहे म्हणून तर जीवनात लज्जत आहे. गंमत आहे. सतत चिडचीडत, परफेक्शनिस्ट असण्याचा अतिरेक करत राहण्यापेक्षा, मनामध्ये कुणाविषयी राग धरुन ठेवण्यापेक्षा मनमोकळं राहून पहावं. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत मग ती माणसे असतील, वस्तू असतील त्याविषयी कृतज्ञ असावं हे अधिक चांगले नाही का?
आयुष्य अगदी सुरळीत, ठीक चाललेलं असतं म्हणूनच की काय, असं आयुष्य मिळण्यात आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव आपल्याला रहात नाही वा बोथट होते. आपली अशी माणसं असणं, गप्पा मारणं, हसत खेळत मौजेत दिवस जाणं, या सगळ्यातलं सुख आपणं इतकं गृहित धरुन चालतो की आहे त्याबद्दल कृतज्ञ वाटायला हवं हेच आपण विसरतो. असलेल्या सर्व गोष्टींपैकी काहीतरी एकाएकी नाहीसं होतं आणि मग त्या असण्यातलं सुख प्रकर्षाने जाणवतं. कुठल्याही क्षणी ‘आहेचं नाही होऊ शकतं’ ‘असण्या’चं ‘नसणं’ होऊ शकतं याचा आपल्याला विसर पडतो.
एक लक्षात घ्यायला हवं की आपण कुणीच अमरत्व घेऊन आलो नाही. वरील उदाहरणातील माधवराव, नीलम काय किंवा रीमा काय..
आयुष्याची वाटचाल चिडचीडत करण्यापेक्षा प्रयत्नपूर्वक स्वत:मधील काही उणीवा दूर करत केली तर ते स्वत:साठी आणि इतरांसाठी आनंदायी ठरेल यात शंकाच नाही. स्विकाराचा परिघ वाढवणं आणि कृतज्ञ असणं या गोष्टी जीवनप्रवास आनंददायी करतात हे मात्र खरे!
अॅड. सुमेधा देसाई