For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चला, विजयाचा पाया रचूया!

06:36 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
चला  विजयाचा पाया रचूया
Advertisement

गंमत बघा, ही स्पर्धा सुरू होण्याअगोदर साधारणत: दीड महिना आयपीएलने भारतात धुमाकूळ घातला. अर्थात फॉरमॅट टी-20 चा. ही स्पर्धा संपता संपता विश्वचषक स्पर्धा सुरू झाली. अर्थात हाही फॉरमॅट टी-20चाच. याच आयपीएलचा प्रभाव भारतीय संघावर किती पडतो हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण याच आयपीएलमधून भारतीय संघातील खेळाडूंनी कोटीच्या कोटी उ•ाणे घेतली होती हे विसरून चालणार नाही. आयसीसीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आपण देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. आयपीएलसारख्या लीगबद्दल जर मला विचाराल तर ती एक करमणुकीची स्पर्धा. मिळणारा बक्कळ पैसा आणि वेळ पडल्यास देशप्रेम बाजूलाही ठेवायचे, असाच काहीसा इरादा बऱ्याच खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळालाय.

Advertisement

असो. स्पर्धा सुरू होण्याअगोदर कशाला हवेत नवखे संघ? आयसीसीने दहा नवख्या संघाला मान्यता दिली? युगांडा, ओमान, नेपाळ यासारखे देश ऑलिम्पिकमध्ये बरे वाटतात. त्यांचे आयसीसीच्या मेगा इव्हेंट क्रिकेटमध्ये काय काम? किंबहुना कशाला या विश्वचषक स्पर्धेचा विचका करायला आलेत? असे नाना प्रश्न माझ्या मनात आले होते. परंतु स्पर्धेची सुऊवात पाहून माझ्यातील आकस हा दूर झाला. आर्ट फिल्मला पहिल्या दोन दिवसात अचानक बॉक्स ऑफिसवर तोबा गर्दी व्हावी तसंच काहीसं चित्र या स्पर्धेच्या सुऊवातीला बघायला मिळालं. क्रिकेटने तब्बल दहा असोसिएट संघांना एकत्र आणलंय हेही नसे थोडके! आज आपला सामना आयर्लंड संघाविऊद्ध आहे. तो संघ नवखा आहे का? तर निश्चितच नाही. त्यांच्यातील नवखेपणा कधीच संपलाय. हळूहळू आता आयर्लंड संघ अफगाणिस्तान संघाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय.

भारतीय संघाने काल-परवा सराव सामन्यात बांगलादेशला पराभूत केलं. परंतु सराव सामना तो सराव सामनाचं असतो. सराव सामन्यातील रणनीती निश्चितच बुचकाळ्यात टाकणारी. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर नेहमी म्हणतात की राजकारणात काय बोलण्यापेक्षा काय नाही बोललं पाहिजे हे महत्त्वाचं असतं. नेमकी तीच गोष्ट क्रिकेटमध्ये. विशेषत: टी-20 सारख्या छोट्या फॉरमॅटमध्ये कुठले आराखडे असण्यापेक्षा कुठले आराखडे नसावेत हे महत्त्वाचं. हे ज्याला उमगलं, समजलं तोच वर्णधार पुढे यशस्वी होतो. टीम इंडियाकडे अनुभवाची कमतरता निश्चितच नाहीये. विराट, सूर्यकुमार, बुमराह यांचा फॉर्म आयपीएलमध्ये कमालीचा उंचावला होता. दुसरीकडे रोहितचा विचार केला तर आयपीएलमध्ये त्याचा ग्राफ कमालीचा खाली होता परंतु 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत सलग दहा विजय कोण विसरणार? दुसरीकडे वेगवान गोलंदाजीचा विचार केला तर बुमराह हा आपल्याकडे हुकमी एक्का आहे.

Advertisement

या सामन्यात कुठला खेळाडू रोहितबरोबर सलामीला जाणार हा एक चर्चेचा विषय आहे. मला जर तुम्ही विचाराल तर ऋषभ पंत हा सलामीला अचूक पर्याय आहे. आयर्लंड संघाविऊद्ध भारताने सातच्या सात सामने जिंकलेत. आयर्लंड संघाचा विचार केला तर बलबिर्नी -स्टर्लिंग ही दमदार सलामीची जोडी खूप वर्षापासून एकत्र खेळते. तर मधल्या फळीत टेक्टर आणि केम्फट हे खेळाडू बऱ्यापैकी स्थिरावलेत. दुसरीकडे जोशूआ लिटिल हा गोलंदाज खतरनाक ठरू पाहतोय. त्याचे आत येणारे चेंडू नेहमीच फलंदाजांना चकरावून सोडतात. अशाच आत येणाऱ्या चेंडूवर आपले दिग्गज फलंदाज गडबडतात हे आपण कित्येकदा पाहिलंय. आयर्लंडचा विचार केला तर त्यांची लंगडी बाजू म्हणजे मंदगती  गोलंदाजी. किंबहुना त्यांच्याकडे मंदगती गोलंदाजीच नाही, असे म्हटलं तर कदाचित वावगे ठरू नये. एकंदरीत काय तर आयर्लंडविऊद्ध भारतीय संघ हा बराच उजवा आहे. परंतु या सामन्यात भारताला सावध खेळ करावाच लागेल. ग्रुप स्टेजमधील नवख्या संघाकडून एक पराभव सुपर एटमधील दारे बंद करण्यास पुरेसा आहे. बघूया, बलाढ्या भारतासमोर नवख्या आयर्लंडची डाळ कितपत शिजतेय. शेवटी हे क्रिकेट आहे. आयर्लंड हा संघ कडवी लढत देतो की सपशेल  लोटांगण घालतो, याचे उत्तर आज आपल्याला निश्चित मिळणार आहे. तूर्तास तरी भारतीय संघाला शुभेच्छा.!

Advertisement
Tags :

.