गोवा वाचवण्यासाठी उभारुया लोकलढा!
निवृत्त मुख्य न्यायाधीश फेर्दिन रिबेलो यांचे गोमतकीयांना आवाहन : डोंगरकापणी, बांधकाम, कॅसिनोंचे वाढते प्रस्थ गोव्याच्या मुळावर
पणजी : गोव्यातील वाढते भू-रूपांतरण आणि त्यातही दिल्लीतील बिल्डरांकडून गोव्यातील जमिनी ताब्यात घेणे तसेच बेकायदा बांधकामे करण्याचे प्रकार वाढले आहेत. किनारी भागातील जमिनीवर अनेक हॉटेलचालकांनी केलेली विनापरवाना बांधकामे आणि कॅसिनोंचेही प्रस्थ वाढले आहे. यामुळे गोव्याचे सामाजिक वातावरण बिघडत असून गोव्याची बदनामीही होत आहे. विरोधात प्रखर चळवळ उभारण्याकरिता आता निवृत्त मुख्य न्यायाधीश, समाजसेवक फेर्दिन रिबेलो यांनी पुढाकार घेतला असून समविचारी नागरिकांना एकत्र आणून आंदोलन उभारण्याची तयारी त्यांनी चालविली आहे.
गोव्यातील वाढते गुन्हे तसेच वाढती बेकायदा बांधकामे, किनारपट्टी भागातील गैरव्यवहार तसेच ड्रग्सचे वाढते व्यवहार यामुळे गोवा हरवत चालला आहे. आतापर्यंत गोव्याचे फार मोठे नुकसान झालेले आहे. हे सारे काही सत्तापक्षांच्या आशीर्वादाने होत असते. त्याचबरोबर राज्यातील विरोधी पक्ष या विरोधात कोणताही आवाज उठवित नसल्याने अखेर अलाहाबाद न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी स्वत: लोक चळवळ हाती घेण्याचे ठरविले आहे. रिबेलो हे स्वत: समाजसेवक आहेत आणि यापूर्वी त्यांनी दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक फालेरो यांच्या विरोधात लढवली होती. तसेच नेहमी सामाजिक क्षेत्रात ते पुढाकार घेत असतात. उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे रिबेलो हे नंतर न्यायमूर्ती म्हणून निवडले गेले. त्यांची नियुक्ती उच्च न्यायालयात करण्यात आली आणि नंतर ते गुजरातमध्ये आणि त्यानंतर अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले होते. निवृत्तीनंतर ते पुन्हा गोव्यात स्थायिक झाले आहेत.
जनतेमध्ये असंतोष
पेडणे तालुक्यातील हरमल येथील ग्रामस्थांनी रविवारी मोर्चा काढून हरमल गाव बिल्डरांपासून वाचविण्यासाठी आक्रोश सुरू केला. चिंबल येथील नागरिकांनी तेथील निसर्गरम्य जमिनीमध्ये मोठा शॉपिंग मॉल उभारण्याच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. या घटना म्हणजे जनतेमधील असंतोष आहे. सरकारने जनतेचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही. त्यामुळेच आता लोकलढा सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे रिबेलो म्हणाले.
लवकरच लोकलढा सुरु करणार
आपण या लोकलढ्यासाठी आता पुढाकार घेतला असून पणजीत लवकरच आपले कार्यालय कार्यान्वित करीत आहे. त्याचबरोबर आपण एकटा लढणार नाही तर सर्व समविचारी नागरिकांनी साथ द्यावी आणि गोव्यातील जमिनी वाचविण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला.
कॅसिनोंना मांडवीतून काढूया बाहेर
रिबलो यांनी मांडवी नदीतून कॅसिनोंना बाहेर काढण्याच्या इराद्याने आम्ही जन आंदोलन उभे करणार आहोत, असे जाहीर केले आहे. लवकरच ते गोव्यातील समविचारी तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून त्यात पुढील कृती निश्चित करणार आहेत.
विरोधी पक्षही सत्तापक्षाशी सामील : रिबेलो
जनता संतप्त असून विरोधी पक्षाची मंडळी या विरोधात मुळीच आवाज उठवत नाही, याचे कारण विरोधी पक्षाचे नेतेदेखील यामध्ये सामील आहेत. त्यामुळे जनतेला आता एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल. आपण याकामी जनतेबरोबर राहून एक चळवळ तयार करण्याच्या इराद्याने बाहेर आलो आहे. गोव्यात ही चळवळ केली नाही, तर गोवा गोमंतकीयांसाठी शिल्लक राहणार नाही, असे न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो म्हणाले.