For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शब्द शस्त्र जया...

06:30 AM Jul 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
शब्द शस्त्र जया
Advertisement

शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा. शब्द हे दुधारी तलवार आहेत. जराशी चूकही पिढ्यानपिढ्या महागात पडू शकते. असं आपल्याला सतत सांगण्यात येतं. चांगली भाषा वापरणे हा एक सद्गुण आहे असं म्हटलं जात असे. तरीही सर्व लोक हे ऐकतीलच असं नसतं. जसं जसं जग पुढे चाललं आहे तसतशी घाणेरड्यात घाणेरडी शिवराळ भाषा सतत वापरण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. किंबहुना हल्लीच्या काळात अपशब्द, शिवराळ भाषा आणि उर्मट आविर्भावात बोलणं हे चक्क स्टेटस सिम्बॉल समजलं जातं.

Advertisement

विशेषत: समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या आणि नवनेतेगिरी करणाऱ्या होतकरू(?) नमुन्यातल्या माणसांचं तर हे व्यवच्छेदक लक्षण आहे. घरातल्या अशा माणसाची ही सवय त्याच्या घरातल्या इतर माणसांना चारचौघात शरमेने मान खाली घालायला लावते. आणि याचीही जाणीव या तथाकथित शहाण्या माणसाला नसते. तो आपल्याच ताणात असतो. माझं कोण काय करणार? आणि मी यांव करीन त्यांव करीन. अमुक तमुक भाऊ, दादा, तात्या, अण्णा माझे खास आहेत. काही माणसांना कोणालाच बरं म्हणायची सवय नसते. जगातला कुठल्याही प्रोफेशनमधला कुठलाही माणूस असो, त्याचं वय कितीही असो, त्याला अनुभव कितीही असो सतत दुसऱ्याची अक्कल काढणे, त्याला शिव्या घालणे, बाकीचे सगळे कसे मूर्ख आणि मीच तेवढा काय तो शहाणा आहे अशी वृत्ती, ही लक्षणं ज्या माणसात दिसतात. त्या माणसाच्या आसपास सभ्य माणसाला फिरकावंसं वाटत नाही. ज्या वेळेला त्या माणसाची ओळख लावून काम करण्याची वेळ येते तेव्हा गरजू माणसं नाइलाजाने त्याच्या पाया पडून, त्याचा माज सहन करून, त्याच्या शिव्या खाऊनसुद्धा आपलं काम करून घेतात आणि काम झालं की पुन्हा त्याच्यापासून सुरक्षित अंतरावर निघून जातात.

कदाचित लोक आसपास फिरकत नसल्यामुळेच लोकांना पाया पडायला लावून एक प्रकारचा विकृत आनंद घेण्यासाठीच ही माणसे एवढे कष्ट करतात की काय असा प्रश्न पडतो. एक साधी गोष्ट या माणसाला कळत नाही. जर आपण भाषा चांगली वापरली जर आपण लोकांशी नम्रपणे गोडपणे बोललो तर लोक आपोआप आपल्या संपर्कात राहतील. आणि लोक संपर्कात राहोत किंवा न राहोत आपण जे बोलतो त्याचा परिणाम सतत आपल्या शरीरावर, आपल्या घरच्या माणसांवर, आपल्या कुटुंबावर, घरावर होत असतो. तेव्हा त्यासाठी तरी चांगलं बोललं पाहिजे! इतरांसाठी नाही पण स्वत:साठी तरी गोड बोललं पाहिजे. गोड बोलणं म्हणजे वरवरचं आणि नेहमी खोटं असतं असं कोण म्हणतं? गोड बोलणारा माणूस सगळ्यांना प्रिय होतो. त्याच्यामुळे त्याचे चार दुर्गुणही झाकले जातात. तोंडाळ, शिवराळ माणूस मनाने कितीही चांगला असला तरी शक्यतो लोक त्याला टाळतातच. कारण खालच्या दर्जाची गलिच्छ भाषा ऐकवत नाही. शिव्या देणे हा तर रितसर आणि कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी शिक्षा आहे. फाटक्या तोंडाच्या माणसाला फणसाची, नारळाची उपमा देतात ती पण सार्वत्रिक नाही आणि असू नये. एखादा मनाने चांगला माणूस तोंडाने वाईट असेल तर तो फणसासारखा आहे हो, असं म्हणून आपण त्याच्या वाईट गुणाचं कौतुकच करत असतो की काय हे एकदा स्वत:ला विचारून घ्यावं. मनाने चांगलं असण्यासाठी बाहेरून शिवराळ, फटकळ, उर्मट असलंच पाहिजे असा काही कायदा नाही. आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी चांगलं होणं हीही काही वाईट गोष्ट नाही.

Advertisement

खरं तर एकदा तोंडातून निघून गेलेला शब्द, धनुष्यातून निघालेला बाण आणि शरीरातून निघून गेलेला प्राण हा कितीही प्रयत्नाने परत आणता येत नाही. गेलेल्या वेळेप्रमाणे गेलेले शब्द हे सुद्धा अपरिवर्तनीय असतात. एकेका शब्दामुळे महाभारतं घडतात. म्हणून माणसाने वारंवार तोंडाला आवर घालावा, असं म्हटलं जातं. पण माणसं आवर घालीत नाहीत. शब्दांचे भाषेचे महत्त्व हे कालातीत आहे. आणि कोणत्याही काळात भाषेसाठी होणारी भांडणं, भाषांच्या अस्मितांवरून होणारे वाद आणि त्याच्यावरून केले जाणारे राजकारण यावरूनच आपल्या लक्षात येते की भाषा किती महत्त्वाची आहे आणि ती किती जपून वापरली पाहिजे! एखादी गोष्ट मुबलक झाली की तिचं महत्त्व नाहिसं होतं, हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे म्हणतात. आजकाल शब्द मुबलक झाले आहेत म्हणण्यापेक्षा संपर्कसाधनं सोपी झाल्यामुळे शब्द कुठेही, कसेही, कितीही, कोणीही उधळले तर त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण राहिलेलं नाही. आणि म्हणूनच शब्दाचं महत्त्व कमी कमी होत जाऊन नाहीसं होण्याच्या घाईला आलेलं आहे की काय? ज्या वेळेला शब्दांना किंमत होती, शब्दही सहजसाध्य नव्हते, त्यावेळेला माणसांवर थोडातरी वचक होता.

पोस्ट खात्यातली तारयंत्रणा ही साहजिकच प्रत्येक शब्दाला पैसे मोजून पाठवण्याचे संदेश होते. एकेका शब्दाला तिथे महत्त्व होतं. एका अक्षराला महत्त्व होतं. कारण त्यावरच पैशाची आकारणी होत असे. म्हणून चतुर माणसं कमीतकमी शब्दात महत्त्वाचे संदेश पाठवत असत. म्हणजेच काय तर त्यांना शब्दांची किंमत होती. पत्र लिहायचं झालं तर बैठक मारून बसावं लागे. अर्धा पाऊण तास त्यासाठी द्यावा लागे. परत ते पत्र त्याला तिकीट लावून पोस्टात टाकून यावं लागे. आपले शब्द दुसऱ्यापर्यंत पोहोचवायला इतके कष्ट पडत असल्यामुळे साहजिकच माणसं लेखी शब्द वापरतानाही खूप काळजीपूर्वक लिहायची. आणि ते लिहीत असताना आपोआपच मनातून विचार केला जायचा. अविचाराने शब्द मांडले जात नसत. कारण पुरेसा वेळ घेऊन मांडलेले ते शब्द होते. आता फोन आले, पाठोपाठ मोबाईल झाले.

चॅटिंग झाले, व्हिडिओ कॉलिंग आले, शब्द कधीही, कुठेही, कसेही, कोणीही उधळावेत अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि शब्दांचं महत्त्व संपलं. मग भावनेच्या भरात आणि उन्मादी वेडात माणसं शिव्या घालू लागली. उर्मट, गुंड असणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटू लागलं आणि इथेच शब्दाची प्रतिष्ठा ढळली. ‘मापात रहायचं, च•ाrत राहायचं!’ यासारखे अत्यंत खालच्या दर्जाचे वाक्प्रचार टाळ्या घेऊन जायला लागले.

ज्या वेळेला शब्दांचं महत्त्व शून्य झालं त्या वेळेला जगात तोंडाळ, शिवराळ घाणेरड्या माणसांची संख्या वाढत गेली. आणि समाजाची भाषा जेवढी खालच्या थराला जाईल तेवढी त्याची वर्तणूक ही खालच्या थराला गेलेली असते. म्हणून समाजात सर्वसामान्यपणे आढळणारा भाषेचा वापर हा त्या समाजाच्या सामाजिक आणि मानसिक आरोग्याचे लक्षण समजावा. भाषा अत्यंत विकृत, घाणेरडी वापरणारा समाज हा चांगला असू शकत नाही. कारण भाषा हे माणसाचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. भाषा, शब्द ही माणसाला मिळालेली देणगी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला बोलता येत नाही म्हणून आपण त्यांना मुके प्राणी म्हणतो. म्हणजे बोलण्याची शक्ती ही परमेश्वराने फक्त माणसाला बहाल केलेली आहे. पण माणसं असा विचार का करत नाहीत की समजा, परमेश्वराने बहाल केलेल्या भाषेत आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर किमान उद्धट, शिवराळ, वाईट हे तरी बोलू नये. कारण एक अपशब्द, एक शिवी पिढ्यानपिढ्यांचं वैर निर्माण करू शकते. याची साधी जाणीवच माणसाला नसते. कारण आपण वैर कसं पोसू शकतो, आपण कोणाला ऐकत कसं नाही किंवा आपलं कोणीच कसं वाकडं करू शकत नाही, ह्याच माजात माणसं आयुष्य घालवतात. आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा समोरच्या माणसाला सहज चेपता येईल अशा भ्रमात ती वावरतात. पण आपण मेल्यानंतर आपल्या पाठी काय होईल हे ह्या माजोऱ्या लोकांना माहिती नसतं. त्यांनी एका वेळेला घातलेल्या चार शिव्यांची किंमत त्यांच्या चार पिढ्यांना मोजावी लागू शकते. निष्कारण वैरं होतात, भांडणं होतात, लढाया होतात.

राष्ट्रच्या राष्ट्रं या भाषेच्या चुकीच्या वापरापायी संपतात. पण माणसं थांबायला तयार नाहीत. त्यांना त्यांची घाणेरडी शिवराळ भाषा इतर कशाहीपेक्षा जास्त हवी आहे. अतिशय अहंमन्य माणसं या असल्या भाषेची जनक असतात आणि ही कीड समाजाला पोखरत चालली आहे हे नक्कीच. द्रौपदीने दुर्योधनाची तीन शब्दात केलेली टिंगल अख्ख्या महाभारताला कारणीभूत झाली. राजा द्रुपदाने द्रोणाचार्यांचा भिकारी म्हणून केलेला अवमान फार मोठ्या विसंवादाला आणि कायमचा हाडवैराला कारणीभूत झाला. आपल्याला ही वैरं घेऊन हे वेडेवाकडे शब्द घेऊन नक्की कुठे जायचं आहे हे आपण एकदा ठरवणार आहोत का?

-अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.