‘चला नदीला जाणूया ’उपक्रम कागदावरच! कलश पूजनानंतर पुढील प्रक्रिया ठप्प
शासनासह प्रशासनाला विसर; नद्यांचे प्रदूषण मात्र कायम
बाळासाहेब उबाळे कोल्हापूर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत राज्यातील नद्या अमृतवाहिन्या करण्याचा संकल्प करण्यात आला. चला नदीला जाणून घेऊया हे अभियान राबवण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे कोल्हापुर जिल्ह्यातील पंचगंगा, कडवी या नद्यांची संवाद परिक्रमा करण्यात आली. पण कलश पूजन झाले आणि पुढील सर्व प्रक्रिया ठप्प झाली. प्रशासनातील 27 विभागातील अधिकाऱ्यांवर या अभियानाची जबाबदारी होती. मात्र या सर्वच विभागातील अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी झटकल्याने अभियान कागदावरच राहिले. यामुळे नद्यांच्या प्रदूषणाचे दुखणे कायम आहे.
पावसाची अनियमितता यामुळे पूर आणि दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार भेडसावत आहेत. त्याचा शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. वाढते औद्योगिकीकरण, नागरीकीकरण यामुळे पाण्याचा वापर वाढत चालला आहे. त्या तुलनेत पाण्याची उपलब्धता कमी होत चालली आहे. नद्या तसेच धरणे, तलावातील वाढत्या गाळामुळे पाण्याची वहन क्षमता आणि साठवण क्षमता कमी होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतहोत्सवांतर्गत राज्यातील नद्यांना अमृतवाहिन्या करण्यासाठी चला जाणूया नदीला हे अभियान जाहीर केले. या अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये शासनाच्या 27 विभागातील जबाबदार अधिकारी आणि काही अशासकीय सदस्य होते. समितीधील सर्वांना कोणी काय करायचे आहे याची जबाबदारी दिली होती. अभियानांतर्गत 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण करायचा होता. 1 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत दुसरा टप्पा पूर्ण करायचा होता. 1 ते 20 जानेवारी 2023 नद्यांच्या केलेल्या अभ्यासाचा अहवाल अंतिम करुन 22 जानेवारी 2022 पर्यंत राज्य शासनाकडे सादर करायचा होता. पण या अभियानासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली केवळ एक बैठक झाली. त्यानंतर कलश पूजन झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठक पहिली आणि अखेरची ठरली. त्यानंतर गेली दोन वर्षे या अभियानाच्या अनुषंगाने काहीच झाले नाही. प्रशासकीय पातळीवर सर्वांनाच विसर पडला. परिणामी नद्यांच्या प्रदूषण कायम आहे.आताही बैठकीत चर्चा होऊन मोठे आदेश निघतील.मात्र नद्यांचे प्रदूषण थांबेल अशी अपेक्षा करणे गैर ठरेल.
असा होता उपक्रम नियोजनाचा कालावधी
माहिती संकलन कालावधी - 8 डिसेंबर 2022
नदी परिक्रमा आराखडा,चित्रफीत
आणि अभ्यासगट निर्मिती -15 डिसेंबर 2022 अखेर
नदी परिक्रमा कालावधी -23 ते 31 डिसेंबर 2022
अमृतवाहिनी मसुदा -20 जानेवारी 2023 अखेर
प्रशासकीय पातळीवर उदासिनता
शासन निर्णय झाला आहे पण त्याप्रमाणे शासकीय पातळीवर तसेच लोकांकडून काम होत नाही. प्रत्यक्ष कामासाठी हात झटकले जात आहेत. शासनाने यामध्ये पुढाकार घेतला तरच नद्यांची स्वच्छता होईल.
संदीप चोडणकर- अशासकीय सदस्य