For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चलो अयोध्याऽऽऽचा पहिला नारा कोल्हापुरातून !

06:23 PM Jan 21, 2024 IST | Kalyani Amanagi
चलो अयोध्याऽऽऽचा पहिला नारा कोल्हापुरातून
Advertisement

1982 साली रामजन्मभूमीसाठी निघाली पहिली मोटारसायकल रॅली : विश्व हिंदू परिषदेचे प्रांत उपाध्यक्ष (कै.) माधवराव साळुंखे यांचा पुढाकार : पी. एस. कुलकर्णी, दिलीप भिवटे यांची साथ : 113 जणांची मोटारसायकल रॅली शरयू नदीच्या तिरावर

Advertisement

संजीव खाडे/कोल्हापूर

1980 मध्ये जनसंघाचे रूपांतर भारतीय जनता पार्टीत झाले. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे भाजपची सूत्रे गेली. आणीबाणीनंतर केंद्रात सत्तेवर आलेले जनता पक्षाचे मोरारजी देसाई यांचे सरकार पडले होते. इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या होत्या. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे देशाची सूत्रे होती. अशा काळात अयोध्येतील रामजन्मभूमीच्या आंदोलनाची चर्चाही नव्हती. नव्वदचे दशक सुरू झाले. रामजन्मभूमीच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली. पण ती मर्यादित होती. 1982 चे वर्ष उजाडले. तेव्हा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलने देशात विस्तारण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी विश्व हिंदू परिषदेचे कट्टर कार्यकर्ते असणारे आणि निस्सिम रामभक्त असणारे माधवराव चंद्रराव साळुंखे यांनी अयोध्येला जाण्याचा पण केला. त्यांना पी. एस. कुलकर्णी, दिलीप भिवटे यांच्यासारख्या कडव्या हिंदुत्वनिष्ठांनी साथ दिली. युवक तयार झाले. 113 युवकांची मोटारसायकल रॅली घेऊन माधवराव साळुंखे यांनी अयोध्येला धडक मारली. कोल्हापुरातून रामजन्मभूमीच्या आंदोलनाची सुरूवात करणारी साळुंखे आणि इतर युवकांची देशातील पहिली मोटारसायकल रॅली ठरली. त्यानंतर रामजन्मभूमीच्या आंदोलनाची धग सुरू झाली. पुढे अनेक आंदोलने झाली. कारसेवा झाल्या. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पडली. यावेळी कोल्हापुरातून असंख्य कारसेवक सहभागी झाले होते. त्यामध्ये माधवराव साळुंखे यांचाही सहभाग होता.

Advertisement

विश्व हिंदू परिषदेचे कार्य सुरू केल्यानंतर शाकाहारी बनलेल्या साळुंखे यांनी रामजन्मभूमीत जो पर्यंत भगवान प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत नाही, तो पर्यंत पायात वाहना (चप्पल) घालणार नाही, असा संकल्प सोडला होता. तो पूर्ण व्हावा, यासाठी साळुंखे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. दुर्दैवाने 2009 साली त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 2020 रोजी रामजन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. आता 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील रामजन्मभूमीत साकारलेल्या भव्य दिव्य राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते आहे. साळुंखे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. आज ते असते तर त्यांचा पणही पूर्ण झाला असता. त्यांना स्वप्नपूर्तीचा आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया त्यांचे सुपुत्र हिंदुत्ववादी नेते संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.

माधवराव साळुंखे यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस अशोक सिंघल, आचार्य धमेंद्रजी, प्रवीण तोगडिया, साध्वी ऋतुंभरा, उमा भारती, विनय कटियार, कल्याणसिंग यांच्याशी निकटचे संबंध होते. साळुंखे यांच्या आग्रहास्तव त्यावेळी अशोक सिंघल कोल्हापूरला आले होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन अभिवादन केले होते. 1987 तो काळ असावा. त्यानंतर त्यांनी करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली होती. पुढे रामजन्मभूमीचे आंदोलन तीव्र होत गेले. अशोक सिंघल यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यामध्ये साळुंखे यांनीही त्यांना कोल्हापुरातून साथ दिली.

6 डिसेंबर 1992 च्या दिवशी कारसेवकांनी बाबरी मशिद हटविली. त्यावेळी कारसेवेसाठी माधवराव साळुंखे, दिलीप भिवटे, अनिल चोरगे व शहरासह जिल्ह्यातील कारसेवक गेले होते. साळुंखे यांना अयोध्येच्या अलिकडेच पोलिसांनी रोखले. एका कारागृहात (कारसेवकांना नजरकैदेत ठेवण्यासाठी गोडावूनला कारागृह केले होते.) ठेवले. दिलीप भिवटे, अनिल चोरगे हे कारसेवक अयोध्येला गेले. ढाचा पाडण्यात चोरगे आघाडीवर होते. रामजन्मभूमीसाठी साळुंखे यांनी कारागृहातच होम घातला. 6 डिसेंबरला बाबरी पडल्याची बातमी आली. कारागृहात सुटका झाल्यानंतर कारसेवक आपापल्या गावाकडे परतू लागले. देशात अनेक ठिकाणी संचारबंदी लागू झाली होती. एक मोहीम पूर्ण करून आल्यानंतर साळुंखे यांच्यासह कारसेवकांनी, रामभक्तांनी कोल्हापुरात रॅली काढून आनंदोत्सव केला. पण त्यावेळी जो पर्यंत राम मंदिर उभे राहत नाही, तो पर्यंत चप्पल घालणार नाही, हा संकल्प साळुंखे यांनी कायम ठेवला. आज ते असते तर त्यांच्या संकल्पाची पूर्ती झाली असतील, पण लौकिक अर्थाने त्यांचा संकल्प पूर्ण झाल्याची भावना त्यांचे सुपुत्र संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांनी व्यक्त केली.

आलो तर तुझा नाही तर रामाचा : अनिल चोरगे


6 डिसेंबर 1992 रोजी बाबरीचा ढाचा पाडणाऱ्या कारसेवकांपैकी एक होते कोल्हापूरचे अनिल बाबुराव चोरगे. ते आज 61 वर्षांचे आहेत. पंचगंगा बँकेतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी कारसेवेसाठी अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची पत्नी सौ. सुधा गरोदर होत्या. अयोध्येला जाताना अनिल यांनी सुधा यांना सांगितले, कुंकू पुसून ठेव. आलो तर तुझा नाही तर प्रभू श्रीरामाचा. त्यांच्या या उद्गाराने सुधा चोरगे हादरून गेल्या, पण कारसेवा करून जेव्हा अनिल परत आले तेंव्हा सुधा आणि चोरगे परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही. अनिल आणि सुधा यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी अयोध्या ज्या शरयू नदीच्या काठावर आहे, त्या नदीच्या नावावरून शरयू असे ठेवले. अनिल चोरगे यांनी आज राम मंदिर उभारत असताना आपण केलेल्या कारसेवेची आठवण काढत आनंद व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.