गंगाजलाप्रमाणे मराठीचा ध्यास घेऊन घरी जाऊया!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन : 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा समारोप
नवी दिल्ली : दिल्लीत भरलेले हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे साहित्याचा व मराठीचा महाकुंभमेळा आहे. जसे आपण या महाकुंभमेळ्याला गेल्यावर तेथील गंगाजल घरी घेऊन येतो त्याचप्रमाणे आपणही या महाकुंभातून परतताना मराठीच्या संवर्धनाचा वसा घेऊन जावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांच्या या निवेदनाने उपस्थित वर्गाने जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. गेले तीन दिवस सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे सर्वकाही झाले असे समजू नये, तर या मराठी भाषेची पताका सर्वत्र फडकवण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. ही मराठी माय आहे. ती ज्ञानभाषा व्हावी आणि वैश्विक भाषा व्हावी, यासाठी सर्वांनी झटून प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
या संमेलनाच्या निमित्ताने शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील आपुलकीच्या नात्याचं दर्शन घडलं. मराठी हा आपणा सर्वांचा बाणा आहे. मराठी ही आपल्या हृदयाची भाषा आहे. मनाची भाषा आहे. ती जगाची भाषा व्हावी यासाठी आपल्या मुलांना जास्तीत जास्तपणे मराठी शिकवा असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना केले. मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संशोधनासाठी अमरावतीला विद्यापीठ निर्माण करीत आहोत अशी घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर दिल्लीतील जेएनयु विद्यापीठात मराठी संशोधन विभाग कविवर्य कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी राजभाषा दिनी सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
साहित्यिकांनी बिनधास्तपणे लेखन करावे : अजित पवार
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेसाठी आणि विकासाकरिता आम्ही वाट्टेल तेवढी मदत करणार आहोत. मात्र साहित्यिकांनी सन्मानाने राहून स्वाभिमानाने कोणत्याही दबावाखाली न येता बिनधास्तपणे लिखाण करावे, असे आवाहन केले. महाराष्ट्राच्या साहित्याला पराक्रमाचा इतिहास आहे. दिल्लीत ज्या ठिकाणी हे संमेलन होत आहे तिथे मराठ्यांची छावणी होती. मराठीच्या अस्तित्वाचा विचार करून पालकांनी आपल्या मुलांना मराठी भाषेतून शिक्षण द्यावे, असे कळकळीचे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
ते पुढे म्हणाले की, मराठीतील हे संमेलन हा सारस्वतांचा मेळा आहे. त्याला फार मोठा इतिहास देखील आहे. ही भाषा संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज आदी अनेक प्राचीन संतांनी प्रभावित केलेली आहे. या भाषेने सर्वांवर संस्कार केलेले आहेत. ही प्राचीन मराठी भाषा अत्यंत प्रगल्भ करण्यात संतांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. मराठी साहित्य क्षेत्रात वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, बहिणाबाई यांनी ही भाषा समृद्ध केलेली आहे. आता मराठीला पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी या भाषेची उपयुक्तता वाढवली पाहिजे. ती शिकली पाहिजे आणि शिकवली देखील पाहिजे. सरकारच्यावतीने आवश्यक असलेली सर्व मदत करू असे आश्वासनही त्यांनी दिले.
मराठीचा वापर जास्तीत जास्त करायला हवा : सामंत
आपल्या भाषणात महाराष्ट्राचे राजभाषामंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी ही संस्कार निर्माण करणारी भाषा आहे आणि तिचा जास्तीत जास्त वापर हा जनतेने करणे आवश्यक आहे. साहित्याचा संस्कार हा याच भाषेने आणि महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिलेला आहे. अलीकडेच मराठी साहित्य विश्वात एक नवा उपक्रम आयोजकांनी राबविला तो म्हणजे गाडीवरील साहित्य संमेलन. चक्क रेल गाडीमध्ये मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. आपण त्याचा एक साक्षीदार ठरलो. आपल्याला त्यादिवशी एवढी पुस्तके प्राप्त झाली की मराठी साहित्य हे केवढे समृद्ध आहे व आजही ते मनामनामध्ये टिकून आहे याची पुन्हा एकदा जाणीव त्या निमित्ताने झाली. मराठी भाषेचे काम करताना चांगल्या भावनेने करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. महाराष्ट्र सरकारचे साहित्य पुरस्कार देताना आपण त्यात मुळीच हस्तक्षेप केलेला नाही व करणारही नाही असेही ते म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी संजय नहार यांच्या कार्याबद्दल कौतुक केले व अभिनंदनही केले.
आमदार, खासदार, मंत्र्यांसाठी ‘छावा’चे खास प्रदर्शन
यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी ‘छावा’ चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. अशा तऱ्हेचे चित्रपट येणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर करण्यात आलेला अत्याचार हे चित्रण दाखविलेले आहे, त्यातून आपले रक्त सळसळते आणि अंगावर काटा उभा राहतो. आजच्या नव्या पिढीला संभाजी महाराजांचा आदर्श यातून स्पष्ट दिसतो. त्यामुळे हा चित्रपट आपल्या मुलांना दाखवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्व मंत्री व आमदार तसेच खासदार यांच्यासाठी एकत्रित खास चित्रपट प्रदर्शन मुंबईत केले जाणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
संभाजी महाराजांचे होणार मोठे स्मारक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की, छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक महाराष्ट्रात होणार आहे. त्या दृष्टीकोनातून काम सरकारने सुरू केले आहे. हे स्मारक देशातील एक सर्वात सुंदर आणि सर्वांनाच प्रेरणा देणारे स्मारक ठरणार, अशा पद्धतीने त्याची उभारणी केली जाईल, अशी घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय दर्डा तसेच कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि संयोजक संजय नहार यांची देखील भाषणे झाली.
अनेकांना वाहिली श्रद्धांजली
संमेलनाच्या समारोप सोहळ्यात एकूण 12 ठराव संमत करण्यात आले त्याचबरोबर माजी संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ मराठी साहित्यिक रा. रं. बोराडे यांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली.
मराठी भाषा पंधरवडा ठराव
दरवषी महाराष्ट्रात 27 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात यावा, असा ठराव संमत करण्यात आला. 14 मार्च हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचा स्मृतीदिन आहे, तर 27 फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती आहे. गावातील ग्रंथालयांना आर्थिक मदत करून ती समृद्ध करावी, असा ठरावही यावेळी संमत करण्यात आला. अमराठी भाषिक प्रदेशात मराठीच्या साहित्य संवर्धनासाठी बृहन्महाराष्ट्रातील साहित्य संस्थांना आर्थिक मदत करावी असा ठराव संमत करण्यात आला. तसेच बोलीभाषांच्या विकासाकरिता व संवर्धनासाठी सरकारने बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.