जाती-धर्मभेद विसरून मराठी शाळा वाचविण्यासाठी एकत्र येऊया
कुडाळ / वार्ताहर : मराठी शाळा आपण टिकविल्या नाहीत, तर मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस यांपैकी काहीही वाचणार नाही. त्यामुळे जाती-धर्मभेद विसरून मराठी शाळांसाठी एकत्र काम करूया, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी कुडाळ येथे आयोजित महाराष्ट्रधर्म शिबिरात बोलताना केले. मराठी अभ्यास केंद्रातर्फे मराठा समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रकाश परब यांच्यासह विविध क्षेत्रांतील मराठीप्रेमी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पवार म्हणाले, "कोकणात मराठी शाळांचा जसा प्रश्न आहे, तसाच स्थलांतराचाही प्रश्न आहे. महाराष्ट्र टिकवायचा असेल, तर कोकण टिकला पाहिजे. बाहेरून आलेले लोक कोकण टिकवणार नाहीत; ते कोकण ओरबाडून येथील साधनसंपत्तीची लूट करतील. हे टाळायचे असेल, तर हिंदू-मुस्लिम या छद्म युद्धातून बाहेर पडून महाराष्ट्रधर्मासाठी एकत्र काम करूया." मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनजागृती व कार्यकर्ता संघटन शिबिरे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. प्रकाश परब यांनी मनोगत व्यक्त करताना भाषा आणि धर्म यांच्या सामाजिक भूमिकेची तात्त्विक मांडणी केली. ते म्हणाले, "आपला देश धर्मनिरपेक्ष असला, तरी भाषानिरपेक्ष नाही. भाषेच्या आधारावर राज्यनिर्मिती झाली असल्यामुळे धर्मापेक्षा भाषा हीच आपली प्राथमिक ओळख आहे. श्रद्धा हा धर्माचा आधार आहे, तर ज्ञान हा भाषेचा आधार आहे. धर्म स्थितिशील आणि आदेशात्मक आहे, तर भाषा परिवर्तनशील व लोकशाहीवादी आहे. समाजात धर्मसंस्थांपेक्षा भाषा आणि ज्ञानवृद्धी करणाऱ्या संस्था वाढल्या, तरच समाजाची प्रगती होईल."
कोकणाला साहित्यिकांप्रमाणेच बाळशास्त्री जांभेकर यांच्यासारख्या विचारवंतांची अभिमानास्पद परंपरा लाभली असली, तरी धार्मिकतेचे अवडंबर आणि मातृभाषेतील शिक्षणाची उपेक्षा यांमुळे उर्वरित महाराष्ट्राप्रमाणे कोकणही बौद्धिक क्षेत्रात मागे पडत असल्याची खंतही डॉ. परब यांनी व्यक्त केली.
शिबिरापूर्वी झालेल्या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपली मते मांडली. या शिबिराला मराठीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधना गोरे यांनी केले.