‘चला व्यसनाला बदनाम करू या’
कोल्हापूर :
सेलिब्रेशनच्या नावाखाली 31 डिसेंबरला तरुण पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारपासून 3 जानेवारीमध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून चला व्यसन बदनाम करू या, या मोहीम राबवली जात आहे. त्यांतर्गत ‘दारू नको दुध प्या’ हा उपक्रम राज्यभर राबवला जात असल्याची माहिती अनिसचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास पोवार, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुल्ला आणि अनिल चव्हाण यांनी दिली.
गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्र अंनिस 31 डिसेंबरच्या आठवड्यात ‘चला व्यसन बदनाम करूया’ मोहीम राबवते. सध्या समाजात व्यसनाचे उद्दात्तीकरण होत आहे. यामध्येतरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच राज्यभरात 31 डिसेंबर दरम्यान व्यसन विरोधी युवा निर्धार मेळावे घेतले जात आहेत. मेळाव्यामध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती पुढील आठवड्यामध्ये समाजात व्यसनच्या विरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसन विरोधी फिल्म शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसन विरोधी फेरीचे आयोजन, शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी जागृती, व्यसनविरोधी प्रतिज्ञा असलेल्या निवेदनावर नागरिकांच्या सह्या घेणे, असे कार्यक्रम राबवले जात आहेत. मंगळवारी, 31 डिसेंबरला ‘दारू नको दुध प्या‘ उपक्रम राबवला जाणार आहे. यामध्ये नागरिकांना मद्याचे दुष्परिणाम सांगून दुध पिण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.