नाचू शिमगोत्सवाच्या रंगी...!
गोवा म्हटला म्हणजे उत्सवांची मांदियाळी. वर्षाचे बाराही महिने या राज्यात कार्यक्रम, उत्सवांची चलती असते. गोव्यात नुकताच कार्निव्हल उत्सव जल्लोषात साजरा झाला. कार्निव्हल आपली संस्कृती नव्हे म्हणून सुरुवातीला काही वर्षे संस्कृतीप्रेमींचा विरोध झाला होता. यासाठी निदर्शनेही झाली होती परंतु या विरोधाला न जुमानता हा उत्सव गेली काही वर्षे निर्विघ्नपणे सुरू आहे. संस्कृतीप्रेमींचा सध्यातरी कार्निव्हल विरोधात सूर मावळल्यातच जमा आहे. काही आमदारांनी तर आपल्या मतदारसंघात खास स्वतंत्रपणे कार्निव्हल आयोजित केला होता. यालाही लोकांचा प्रतिसाद लाभला. कार्निव्हलनंतर वेध लागतात, ते शिमगोत्सवाचे. गोव्यात सध्या शिमगोत्सव सुरू आहे. ज्याप्रमाणे संत नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी’, असे म्हटले होते, याला अनुसरून ‘नाचू शिमगोत्सवाच्या रंगी’, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
गोमंतकीय शिमगोत्सवाला मोठी परंपरा लाभलेली आहे. याद्वारे गोव्याच्या संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडते. दरवर्षी गोव्यात हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यामध्ये सहभागी होणारे चित्ररथ रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे असतात. बेधुंद नृत्य करणारी रोमटामेळ पथके, लक्षवेधी घोडेमोडणी नृत्य, प्रत्येक पथकाच्या पोषाखातील विविधता आदींमुळे हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जनसागर लोटतो. गोव्याची पारंपरिक वेषभूषा, विविध पौराणिक कथानकांवर आधारित चित्ररथ व हलते देखावे, यामुळे गोव्याची संस्कृती व लोककलेचे दर्शन घडणार आहे. गोव्याची लोककला मनाला भुरळ घालणारी आहे. लोककला ही केवळ कला नसून पारंपरिक संस्कृतीचे दर्शन देणारी आहे.
पेडणेपासून काणकोणपर्यंत शिमगोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. शिमगोत्सव म्हणजे लोकगीत, लोकसंगीत, ऐतिहासिक वारशाची महती सांगणारा. त्याचप्रमाणे परंपरेने जोपासलेला, लोकविश्वास, श्रद्धा यांच्या बळावर आजवर टिकून असलेल्या शिमगोत्सवाची रुपे अनंतकाळापर्यंत टिकावीत व भावी पिढीला त्यांची ओळख घडावी, या हेतूने हे संचित जपणे गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. गोव्यातील श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा श्री अवतार पुरुषाचा कौल, अवसर, तळया, वीरामेळ, शिमगोत्सव, दिवजोत्सव व शिमग्याची जत्रा प्रसिद्ध आहे. या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. आज काही गावात होळी पेटविल्यानंतरच पारंपरिक शिमगोत्सवाला प्रारंभ होईल. होळी पेटविल्यानंतर गावागावात शबय, शबयऽऽ व ढोल-ताशांच्या ‘घुमचे कटर घुम’ निनादासह शिमग्याचा उत्साह संचारणार आहे. काही भागात पाच तर काही ठिकाणी सात ते नऊ दिवस शिमगा पारंपरिक पद्धतीने साजरा करतात. धुलीवंदन, चोरोत्सव, रोमट आदी पारंपरिक प्रकार त्या-त्या भागातील शिमगोत्सवाचे वैशिष्ट्या आहे. शिमगोत्सवानिमित्त आता गावागावात ढोल-ताशांची दुरुस्ती तसेच जमवाजमव सुरू झाली आहे. सरकारी पातळीवरही शिमगोत्सव साजरा होणार आहे. चित्ररथ देखावे, रोमटामेळ, लोकनृत्य, वेषभूषा अशा विविध स्पर्धांची यात रेलचेल असते.
शिमगोत्सव काळात डिचोलीतील बोर्डे, पिळगाव, कुडणे, कारापूर आदी काही ठराविक भागात पारंपरिक पद्धतीने ‘गडे उत्सव’ साजरा करण्यात येतो. साळ गावातील गडे उत्सव प्रसिद्ध आहे. सदर उत्सव उद्या शुक्रवार दि. 14 ते रविवार दि. 16 मार्चपर्यंत चालणार आहे. या गडे उत्सवाला नावलौकिक प्राप्त झाला आहे. तीन दिवस हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. शिमगोत्सवात काही भागात पारंपरिक लोकनृत्य असलेल्या ‘घोडेमोडणी’ प्रकारामध्ये लोककलेचे दर्शन घडते. विदेशी पर्यटकांनाही गोमंतकीय शिमगोत्सव आकर्षित करीत आहे.
गोवा म्हणजे जणू ‘खा, प्या, मजा करा’ अशी ओळख. गोव्याला समुद्रकिनाऱ्यावरील संस्कृती असल्यामुळे संगीत रजनी, पार्ट्यांचा सुकाळ, अंमलीपदार्थ व्यवसाय, मद्यालये आदी बाबींमुळे ही ओळख निर्माण होणे साहजिकच आहे. या पलीकडेही या ठिकाणी संस्कृती नांदते, हे जगासमोर सिद्ध करणे आता गोमंतकीयांची जबाबदारी आहे. अशाप्रकारच्या उत्सवातून हे सहज शक्य आहे.
गोव्यातील किनाऱ्यांवर ‘डीजे’च्या तालावर केवळ नंगानाच होत नाही तर याठिकाणी फुगडी, भजन, नाटके, तियात्र, धालो, ओव्या तसेच विविध संस्कृतीप्रधान सण-उत्सवही होतात. गोमंतकीय संस्कृतीचा उदो-उदो होतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अंमलीपदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या, पाश्चात्य संस्कृतीचा उदो-उदो करणाऱ्यांना आता गोमंतकीय संस्कृतीचा ‘डोस’ पाजण्याची नितांत गरज आहे. शिमगोत्सव, नाटके तसेच अन्य लोकसंस्कृती जपणारे उत्सव गोवा राज्यात टिकले तर गोंयकारपण खऱ्या अर्थाने शाबूत राहील. हे संचित जपण्यासाठी सरकारने तसेच विविध क्षेत्रातील गोमंतकीय कलाकारांनी आतापासूनच कार्यरत राहणे गरजेचे आहे.
नववर्ष उजाडल्यापासून राज्यात समुद्रकिनारी ज्या घटना घडल्या, त्यामुळे राज्यातील समुद्रकिनारी पर्यटन सुरक्षित आहे का, असा साहजिकच सवाल उपस्थित होत आहे. पर्यटनदृष्ट्या सोशल मीडियावरून जी गोव्याची बदनामी होत आहे, त्यामुळे सध्या पर्यटकांची संख्या रोडावल्याचे दिसून येत आहे. विदेशी पर्यटकांचीही संख्या कमी झाल्याचे दिसून येते. समुद्रकिनारी होणाऱ्या विविध घटनांचा परिणाम समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या सुसंस्कृत कुटुंबांवर होत आहे. हरमल येथील एक युवा वकील स्वप्नील नारायण दाभोलकर यांनी तर ‘विदेशी पर्यटकांचा धोका आणि उपद्रव’ यावर चक्क मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले आहे. येथील जे गैरप्रकार आहेत, ते रोखून एक आदर्श पर्यटन करणे आवश्यक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या विविध कारणांमुळे समुद्रकिनारा बदनाम होत असल्याने शांततापूर्ण जीवन जगणे किनारपट्टीनजीक राहणाऱ्या कुटुंबांना अशक्य बनले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर म्हणा पर्यटकांकडून जाहिरातींनी, चित्रांनी रंगविले जातात. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत असून यावर वेळीच पायबंद घालण्याची मागणी अॅड. दाभोलकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही विदेशी पर्यटक अनधिकृतपणे व्यवसायही चालवित आहेत. कोणतेही परवाने न घेता बेकायदा भोजनालयेही चालवितात. तसेच रेस्टॉरन्टमध्ये प्रमाणित डेसिबलच्या पलीकडे मोठ्याने संगीत वाजविले जात असल्याने स्थानिकांची झोपमोड होत असून आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. एकंदर किनारी भागाची सुधारणा करावी, अशी त्यांची मागणी आहे.
गोवा ही केवळ भोगभूमी नसून ती देवभूमी, योगभूमी आहे, हे सिद्ध करण्यासाठी कुंडई-फोंडा येथील तपोभूमी गुरुपीठाद्वारे जे कार्य चाललेले आहे ते खरोखरच गौरवास्पद आहे. श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधीश आध्यात्मिक धर्मगुरु पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘गोवा आध्यात्मिक महोत्सव 2025’ हा महासोहळा गेल्या रविवारी बायणा समुद्रकिनाऱ्यावर देश-विदेशातील संत-महंत, दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बायणा समुद्रकिनाऱ्याला समुद्र आरतीसाठी कायमस्वरुपी स्थळ घोषित केले आहे. अशा उपक्रमांतून गोवा खऱ्या अर्थाने आध्यात्मिकदृष्ट्या सुजलाम्, सुफलाम् होऊ शकतो, याबद्दल खात्री आहे.
गोव्यात सध्या केवळ समुद्रकिनारी नव्हे तर आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने गोवा सरकार कार्यरत आहे. शिमगोत्सव त्याचप्रमाणे आध्यात्मिक महोत्सव तसेच येथील विलोभनीय देवस्थानचा गोव्याबाहेर प्रचार, प्रसार व्हायला हवा, जेणेकरून गोव्याकडे पाठ फिरविणारे पर्यटक या उत्सवांकडे आकृष्ट होतील. त्यामुळे पर्यटनालाही खऱ्याअर्थाने चालना मिळू शकेल. किनारी संस्कृतीमुळे बदनाम झालेले गोव्याचे नाव आज सुधारण्याची गरज आहे. गोवा ही भोगभूमी नसून ती देवभूमी, संतभूमी, योगभूमी आहे, हे साऱ्या जगाला पटवून देण्याची जबाबदारी गोमंतकीय कलाकारांची तसेच गोवा सरकारचीही आहे. त्यामुळे शिमगोत्सव व गोव्यातील अन्य पारंपरिक उत्सवांचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
राजेश परब