गोव्यातील विकासाबाबात सहकार्य करू
यादव, वैष्णव यांचे आश्वासन : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या केंद्रीय मंत्र्यांशी बैठका
पणजी : गोव्यात साधनसुविधा निर्माण करण्यासाठी आणि लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्रामार्फत यापुढेही सहकार्य दिले जाईल. गोव्याच्या विकासाबाबत ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच सहकार्य करू, असे आश्वासन केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी केंद्रातील नेत्यांची भेट घेऊन गोव्यातील विकासकामांबाबत चर्चा केली. यावेळी गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर हेही त्यांच्या समवेत उपस्थित होते.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सावंत यांनी राज्यातील पर्यावरण आणि वनांशी संबंधित विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. केंद्रीय रेल्वे आणि आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर या बैठकीत कोकण रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढवण्यावर, सुधारित कनेक्टिव्हिटीवर आणि वाहतूक क्षेत्राला बळकटी देण्यावर त्यांनी फलदायी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आणि कोकण रेल्वेच्या विकासाला चालना देण्यासाठी सतत पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.