दिवाळी करूया, कर्णकर्कश संगीत टाळूया!
रात्री बारापर्यंतच करावे लागतील कार्यक्रम: कर्णकर्कश संगीत लावणाऱ्यांवर होणार कारवाई : नरकासुर मंडळांनी नियमांचे पालन करावे
पणजी : दिव्यांचा उत्सव म्हणजेच दीपावली उत्सवाला आजपासून गोव्यात थाटात प्रारंभ होत आहे. राज्यामध्ये दिवाळीचे वैशिष्ट्या असलेल्या नरकासुराच्या प्रतिमा उभारणारे कलाकार सज्ज झाले आहेत. पावसाचे संकट जरी असले तरी दिवाळीच्या स्वागताला सारा गोवा सज्ज झाला आहे. मात्र दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलिसांच्या नाकावर टिचून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करण्यासाठी काही नरकासुर मंडळे सज्ज झाली आहेत. आज बुधवारी रात्री बारा वाजता कार्यक्रम पूर्णत: बंद झाला पाहिजे, या निर्णयावर पोलिसयंत्रणा किती सजग राहते, यावर सारी भिस्त अवलंबून आहे. दिवाळी उत्सवासाठी काल मंगळवारी राज्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी जनतेची एकच गर्दी उसळली होती आणि त्यामुळे बहुतांश बाजारपेठांमधील वाहतूक कोंडी एवढी वाढली की असंख्य गाड्या अडकून पडल्या. एकंदरीत पणजीला येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये प्रचंड वाढ झाली असून रात्री उशिरापर्यंत पणजीत जाईल त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
पावसाने घेतली थोडी विश्रांती
मंगळवारी सायंकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली. त्यामुळे या दिवाळी उत्सवाचे खास वैशिष्ट्या असलेल्या नरकासुरांच्या प्रतिमांची पुनर्बांधणी करणे शक्य झाले. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमा भिजल्याने काही आडव्यादेखील पडल्या होत्या. काही ठिकाणी आयोजकांनी ताडपत्री व प्लास्टिक कव्हर टाकून प्रतिमांचे जतन करण्यात यश मिळविले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत नरकासुराच्या अवाढव्य प्रतिमा उभारण्याचे काम चालू होते. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमा उभ्या केल्या जातील. काही ठिकाणी दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज बुधवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे तर अनेक ठिकाणी रात्री नऊ वाजता नरकासुर प्रतिमा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
बारापर्यंत कार्यक्रम आटोपण्याचा आदेश
राज्यातील काही मंडळांनी रात्री उशिरा बारानंतर ऑर्केस्ट्रा तसेच नरकासुर प्रतिमा स्पर्धा पहाटे दरम्यान आयोजित केल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होता कामा नये यासाठी पोलिसांनी सर्व मंडळांना रात्री बारापर्यंत सारे कार्यक्रम उरकून टाका, असे आदेश दिले आहेत. जे कोणी त्यानंतर कार्यक्रम करतील त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात पणजी म्हापसा, कळंगुट, साखळी, डिचोली तसेच फोंडा, मडगाव, कुडचडे, वास्को येथील पोलिसस्थानके नरकासुर मंडळांना त्यांचे कार्यक्रम वेळेत आटोपा, असे आदेश देत होते.
नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
जी मंडळे पोलिसांच्या नाकावर टिच्चून रात्री उशिरा कार्यक्रम करतील त्यांच्यावर ध्वनी प्रदूषणाच्या अंतर्गत व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे. ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होतील त्या ठिकाणी पोलीस देखील जबाबदार ठरतील त्यामुळे पोलिसांनी कंबर कसली आहे. मंगळवारी सायंकाळी दीपावलीच्या पूर्वसंध्येला अनेक सार्वजनिक ठिकाणी तसेच सर्व हिंदू बांधवांनी आपल्या घरावर विद्युत रोषणाई केली आहे. त्याचबरोबर रंगीबेरंगी आकाशकंदील देखील लावले आहेत. दिव्यांच्या झगमगाटात आज सायंकाळी दिवाळीच्या सणाला प्रारंभ होईल. रात्री नरकासुर प्रतिमा उभारून उद्या गुऊवारी पहाटे त्यांचे दहन केले जाईल. नरक चतुर्दशी उत्सवाने दिवाळीला प्रारंभ होईल.
मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
नरकासुर मिरणुकीदरम्यान वाजवण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजातील कर्णकर्कश संगीतामुळे वृद्ध व्यक्तींना त्रास होतो, अशी तक्रार पणजी सांत इनेज येथील काही नागरिकांनी मानवी हक्क आयोगाकडे केली आहे. त्याची दखल घेत संबंधितांनी नरकासुर मिरवणूक आणि दहनावेळी वाजवल्या जाणाऱ्या संगीताचा आवाज मर्यादीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नरकासुर मिरवणुकीवेळी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाकडे प्रदूषण नियंत्रणसह पोलिसांचे लक्ष असणार आहे. मानवाधिकार आयोगाने दिलेल्या निर्देशांमुळे पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे. खासकरून पणजी परिसरातील नरकासुरांवर लक्ष ठेवले जाईल. राज्यातील प्रत्येक पोलिसस्थानक प्रमुखाने त्यांच्या हद्दीतील नरकासुर मंडळाच्या प्रतिनिधीना बोलावून त्यांची बैठक घेतली आहे.
नरकासुर मंडळानी नियमांचे पालन करावे तसेच रात्री 12 नंतर संगीत बंद व्हायला पाहिजे असे सांगितले आहे. नरकासुराच्या वेळच्या कर्णकर्कश संगीताचा वृद्धांना त्रास होत असल्याची तक्रार एका नागरिकाने मानवी हक्क आयोगाकडे केली. आयोगाने सुनावणी घेऊन परिसराची पाहणी केली. नरकासुर आयोजकांच्या वतीने श्रीयश चारी यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली. सध्याच्या स्थानावरून नरकासुर बनवायला हरकत नाही. मात्र, कामत आर्केड इमारतीपासून 20 मीटर अंतर असावे. संगीताचा आवाज मर्यादेत असावा. आयोगाने पोलिसांना आवाजाचे मोजमाप करून नोव्हेंबरपर्यंत आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष डेस्मंड डिकॉस्टा आणि सदस्य प्रमोद कामत यांनी हा आदेश जारी केला आहे.