पंतप्रधानांच्या सात सूचना सवयी बनवूया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतवासियांना केलेल्या सात सूचनांकडे आपण कसे पाहतो? कसे त्यांचे आचरण करणार? त्यात पंतप्रधानांचा वैयक्तिक फायदा नाही, किंवा राजकीय फायदाही नाही. सूचनांचे पालन केल्याने त्यांच्या पक्षाला मिळणाऱ्या मतांच्या संख्येत वाढ होणाऱ्यातलाही भाग नाही. पण सूचनांचे पालन करण्याऱ्यांचा मात्र वैयक्तिक फायदा आहे, राज्यहीत तसेच देशहीतही नक्कीच आहे. देशाची अर्थ व्यवस्था सांभाळण्यासाठी भाषणांची नव्हे, तर जमिनीस्तरावरील कडक, प्रभावी निर्णर्यांची आवश्यकता असते. त्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी जनमन घडविण्याचे कार्य करणारा नेताच खरा जननायक असतो.
पंतप्रधानांनी केलेल्या सात सूचना देशाची मजबूत असलेली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी अत्यावश्यकच आहेत. 1. वर्षभर सोने खरेदी टाळा, 2. इंधनाचा वापर कमी करा, 3. स्थानिक वस्तू खरेदी करा, 4. विमान प्रवास टाळा, 5. विदेशात पर्यटन करु नका, 6. देशात पर्यटनाला पसंती द्या,
- ऑनलाईन काम करा. या सात सूचनांचा गांभीर्याने विचार करायला हवा. जगाची अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या घेऱ्यात सापडलेली असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत आहे. भारतात कशाचाच तुटवडा नाही. कोणताच देश भारताशी दुश्मनी घेऊ पाहत नाही, उलट एक एक करत बहुतांश देश भारताशी मैत्रीचे पर्व जोडत आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक
गॅससाठी जगात त्राही त्राही असताना भारतात पुरेसा इंधन पुरवठा होत आहे. यामागे पंतप्रधानांची प्रभावी राजकीय मुत्सद्देगिरी आहे. त्यांचे विदेशातील दौरे पर्यटनासाठी नसतात, तर देशाच्या मजबूतीकरणासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी असतात. 2014 साली किंवा त्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था जगात 10 व्या किंवा 11 व्या स्थानी असायची. 2015 पासून भारताची अर्थ व्यवस्था बळकट होऊ लागली. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने पायाभूत निर्णय घेत देशाला विकासाच्या मार्गावर आणून ठेवले.
सर्वांगीण विकास आणि मजबूत अर्थव्यवस्थेमुळे आज भारत चौथ्या क्रमांकावर असून तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळण्यासाठी झेप घेतलेली आहे. अशी अर्थ व्यवस्था मजबूत असतानाही पंतप्रधानांना वरील सात सूचना करण्याचा निर्णय का घ्यावा लागला? हे सच्च्या भारतवासियांनी समजून घेतले पाहिजे.
भारतीयांना सोने खरेदीचे प्रेम खूप आहे. गोव्यात तर काहींना सोन्याचे वेडच आहे. लग्नसोहळ्यातच नव्हे, तर कितीतरी कारणांनी गोव्यात सोने खरेदी केली जाते. पंतप्रधानांनी देशवासियांना केलेली ही पहिली सूचना गोमंतकीयांनी अधिक गांभीर्यानी घ्यायला हवी. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे आपल्या देशातील धन मोठ्या प्रमाणात विदेशात पोहोचते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने खरेदी अशी करावी की त्यासाठी खर्च केलेले धन आपल्याच देशात राहील, ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील.
इंधनाचा वापर कमी करावा, ही दुसरी सूचनाही गोमंतकीयांनी गांभीर्याने घ्यायला हवी कारण, गोव्यात जेवढे वाहनांचे प्रमाण आणि त्यावर खर्च होणाऱ्या इंधनाचे प्रमाण देशातल्या अन्य कोणत्याच राज्यात नाही. विदेशी वाहन सोने असणे हे काहींना भूषणावह असेल, पण अर्थशास्त्राच्या दृष्टीने ते देशाला घातक ठरते. गोव्यात लोकसंख्येपेक्षा वाहने अधिक आहेत. ही संख्या वाढतीच आहे. वाहनांशिवाय कुठेही चालत जाणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. गाडी चालूच ठेवून गप्पा मारणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. विनाकारण पेट्रोल वाया घालविणाऱ्यांचीही संख्या तुलनेने गोव्यातच अधिक आहे. डिझेल, एलपीजीचा वापर नियंत्रित असला तरी पेट्रोलच्या वापरावर कोट्यावधी रुपये खर्च होतात. त्यासाठी देशाला विदेशांकडे मोठी किंमत मोजावी लागते, ज्यामुळे गोव्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणून राष्ट्रहितासाठी इंधनाचा वापर आवश्यक तेवढाच करायला हवा.
विदेशी वस्तू, कपडे, वाहनांचेही भारतीयांना अलीकडे बरेच वेड लागले आहे. या खरेदीमुळेही देशातील धन विदेशांमध्ये जाते. काहीही झाले तरी ‘स्वदेशी’ सोडायची नाही. स्थानिक वस्तूंचीची खरेदी करायची. ‘व्होकल फॉर लोकल’ हाच आपल्या सर्वांच्या विकासाचा मार्ग आहे. थोडासा पैसा आला की काहींमध्ये विदेशांचे आकर्षण वाढू लागते. त्यातून विदेशात पर्यटन दौरे वाढतात, विदेशी वाहन खरेदी वाढते. यामुळे आपल्या देशातील धन विदेशांत जाते. हे लक्षात घ्यायला नको काय? पंतप्रधानांनी जी सहावी सूचना केली आहे, ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या देशात अद्भूत, अलौकीक, अतर्क्य अशी हजारो पाहण्यासारखी ठिकाणे आहेत, धार्मिक स्थळे आहेत. आपला स्वत:चा देश संपूर्ण पहायचा ठरवले तरी उभे आयुष्य पुरणार नाही, एवढे आहे या देशात! ते पहा! सर्व काही देशातल्या देशात राहील. राज्याराज्यांतील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. ऑनलाईन काम करण्याची सातवी सूचनाही भारतीयांना नवीन नाही. कोरोनाच्या काळात भारतीयांनी ती यशस्वी करुन दाखवली आहेच. पंतप्रधानांच्या सातही सूचना आपल्या सवयी बनल्या पाहिजेत. त्यामुळे सध्या मजबूत असलेली भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, यात कोणताही संदेह नसावा.
राजू भिकारो नाईक