फ्लॉरेन्सच्या धर्तीवर छत्रपती राजाराम महाराजांचे स्मरण व्हावे
पुण्यस्मरणदिनी आजी - माजी राजारामिन्सची भावना : चरित्रही प्रकाशित करण्याची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी
दीडशे वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थानात सर्वजनांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे, असे स्वप्न पाहणारे, त्यासाठी आग्रह धरणारे आणि शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या छत्रपती राजाराम महाराज यांना त्यांच्या 153 व्या पुण्यतिथीदिनी गुरूवारी अभिवादन करण्यात आले. राजाराम महाविद्यालयात झालेल्या या स्मरण कार्यक्रमात आजच्या युवापिढीसह येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती राजाराम महाराजांचे जीवन, कार्य समजावे, यासाठी त्यांचे इटलीतील फ्लॉरेन्स येथील स्मारकाप्रमाणे स्मारक व्हावे, अशी भावना आजी माजी राजारामिन्सनी व्यक्त केली. राजाराम महाराजांवरील चरित्र प्रकाशित करण्याची मागणीही यावेळी झाली. त्याची जबाबदारी बाळ पाटणकर यांनी घेतली.
कोल्हापूर संस्थानच्या इतिहासात अनेक छत्रपती झाले. त्यामध्ये करवीर संस्थापिका महाराणी छत्रपती ताराराणी, राजर्षी शाहू महाराज, त्यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे जीवन कार्य सर्वश्रृत आहे. पण इतर छत्रपतींप्रमाणेच वीस वर्षांचे उणेपुरे आयुष्य लाभलेल्या छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांच्याविषयी फारशी माहिती नाही. आजच्या या स्मरण दिनीच्या कार्यक्रमात प्रा. रघुनाथ कडाकणे यांनी राजाराम महाराजांच्या माहीत नसलेल्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. पाटणकर घराण्यात 13 एप्रिल 1850 रोजी जन्मलेले नागोजीराव पाटणकर पुढे छत्रपती घराण्यात दत्तक आले आणि त्यांचे नामकरण राजाराम महाराज दुसरे असे झाले. सोळाव्या वर्षी 18 ऑगस्ट 1866 रोजी ते कोल्हापूरचे छत्रपती झाले. युरोप दौऱ्यावर असताना 30 नोव्हेंबर 1870 रोजी इटलीतील फ्लॉरेन्समध्ये त्यांचे वयाच्या विसाव्या वर्षी निधन झाले. पण आपल्या चार पाच वर्षांच्या कालखंडात राजाराम महाराज यांनी रयतेबरोबरच इंग्रज अधिकारीच नव्हे तर इंग्लंडची राणी, राजकुमार यांच्यावरही प्रभाव पाडला. इंग्रजीवर प्रभुत्व असणाऱ्या राजाराम महाराजांनी कोल्हापूर संस्थानात इंग्रजी शिक्षण सर्वजनासाठी सुरू करण्याचे स्वप्न पाहिले. त्यादृष्टीने सुरूवातही केली. त्याकाळी हिंदू धर्मात समुद्र पर्यटन निषिद्ध असताना समुद्र ओलांडून जाणारे ते कोल्हापूर संस्थानचे पहिले छत्रपती होते, ते कसे प्रागतिक विचाराचे होते, युरोपमध्ये त्यांनी इंग्लंडच्या राणी, राजकुमारांची कशी भेट घेतली, ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट देताना तेथील प्राध्यापकाशी इंग्रजीत प्रभावीपणे कसा संवाद साधला. येथील संस्कृती, शिक्षण, सभ्यता विषयी कशी माहिती घेतली. युरोप दौऱ्यावर असताना प्रत्येक दिवसाची नोंद ठेवणारी डायरी त्यांनी कशी लिहिली, त्यांचे अकस्मिक निधन झाल्यानंतर इटलीच्या सरकारने त्यांच्या देशात राजाराम महाराजांच्या पार्थिवाचे दहन करण्यास कशी परवानगी दिली, तेथे करण्यात आलेले अंत्यसंस्कार, इंग्लंडच्या राणीने त्यांचे इटलीतील फ्लॉरेन्समध्ये अर्नो नदीच्या किनारी उभारलेले स्मारक आदीची माहिती प्रा. रघुनाथ कडाकणे यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव व्ही. एम. शिंदे यांनी आपल्या भाषणात राजाराम महाराजांच्या जीवन कार्यावरील पुस्तकाची निर्मिती करण्याची सूचना केली.
पाटणकर घराण्यातील बाळ पाटणकर यांनी आपल्या भाषणात राजाराम महाराजांच्या स्मारकासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी प्राचार्यांसह प्राध्यापक आजी माजी राजारामिन्सनी सहकार्य करावे, अपेक्षा व्यक्त करत चरित्र प्रकाशित करण्यासाठी आपण सर्व मदत करू, असे स्पष्ट केले. प्राचार्या डॉ. वाय. पी. अत्तार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. संजय पाठारे यांनी मानले. कार्यक्रमाला सिद्धार्थ पाटणकर, नकुल पाटणकर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, महाविद्यालयाचे माजी मानद सचिव शशिकांत पाटील, दीपक जमेनिस, हेमंतबापू पाटील, शशांक पाटील, श्रीकांत सावंत, संजय तोरस्कर, संग्राम पाटील, शाहू काटकर, दिलावर महात, रवी चोपडे, रिमा शेळके-पाटील, स्मिता सावंत-मांढरे, जब्बीन शेख, वारणा वडगावकर आदी उपस्थित होते.