एकजुटीने आव्हानांचा सामना करुया!
युद्धस्थितीवर पंतप्रधानांची ‘मन की बात’ : अफवांपासून दूर राहण्याचाही सल्ला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
‘मन की बात’च्या 132 व्या भागात मध्य-पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकजूट दाखवण्याचा आणि अफवांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. सध्याच्या संवेदनशील काळात राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. अफवा पसरवणारे लोक देशाचे नुकसान करत असल्याचा इशारा देताना जनतेला केवळ सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या 132 व्या भागात अमेरिका-इस्रायल युद्ध आणि इराण युद्धाचा उल्लेख केला. जगात युद्ध सुरू आहे. पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण झाले आहे,
परंतु भारत या आव्हानाचा सामना करत आहे. काही लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते देशाचे नुकसान करत आहेत, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. सध्या युद्ध सुरू असलेला प्रदेश आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी एक प्रमुख केंद्र असल्यामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे संकट निर्माण होत आहे. आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारा पाठिंबा आणि गेल्या दशकात आपल्या देशाने निर्माण केलेली ताकद, यामुळे भारताला या आव्हानांना धैर्याने सामोरे जाणे शक्य झाले आहे. यापूर्वी आपण आपल्या 140 कोटी नागरिकांच्या सामर्थ्याने कोरोना संसर्गासारख्या मोठ्या संकटांवर मात केली आहे, त्याचप्रमाणे आपण सर्व मिळून या कठीण परिस्थितीतूनही विजयी होऊ, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
आखाती देशांमधील भारतीयांना मदत सुरूच
गेल्या एका महिन्याहून अधिक काळ आपल्या शेजारी भीषण युद्ध सुरू आहे. आपले लाखो कुटुंबीय या देशांमध्ये राहतात. अनेक लोक आखाती देशांमध्ये काम करतात. सरकार आखाती देशांच्या संपर्कात असून तेथील 1 कोटींहून अधिक भारतीयांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.