बुद्धविहारातून शांततेचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात जावा- पालकमंत्री उदय सामंत यांचे भावोद्गार
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील थिबा कालीन बौद्धविहार बांधण्याबाबत दिलेला शब्द मी पूर्ण करु शकलो याचा मला अभिमान आहे. ही वास्तु येत्या वर्षभरात पूर्ण करून या बुद्धविहारातून शांतीचा संदेश रत्नागिरी जिह्यात, कोकणातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जावा अशी भावना पालकमंत्री उदय सामतं यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क कार्यलयामागे असणाऱ्या थिबाकालीन बुद्ध विहार विकसित करण्याच्या कामाचा शुभारंभ सोमवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला. या समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याच कार्यक्रमावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाचे भूमीपूजनही पालकमंत्री सामंत यांनी केले. यावेळी थिबाकालीन बुद्धविहार विकास समितीचे पदाधिकारी प्रकाश पवार, एम. बी. कांबळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अधीक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विजय चिंचाळकर, रत्नागिरीच्या अधीक्षिका किर्ती शेडगे, प्रांताधिकारी जीवन देसाई, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बुद्धविहार समितीच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी आभार मानले.
या बुद्ध विहारासाठी जागा द्यावी म्हणून समाजातील व्यक्ती मागील पन्नास वर्षापासून प्रयत्न करीत होत्या. आपणही गेली दहा वर्ष सातत्याने येथील प्रमुख व्यक्तींबरोबर जाऊन मंत्रालयात बैठका घेत होतो. परंतु हा प्रश्न नुकताच दोन महिन्यापूर्वी मार्गी लागल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून यासाठी सात कोटीहून अधिकचा निधी आपण दिला आहे. परंतु हा कार्यक्रम ठरल्यानंतरही काहीजण विरोधात समाज माध्यमात माझ्या विरोधात पोस्ट शेअर करीत आहेत. या पोस्ट शेअर करणाऱ्यांचे करायचे काय याचा निर्णय आता तुम्हीच घ्यावा. हा बुद्धविहार वर्षभराच्या आत पूर्ण करुन, तुमच्या स्वाधीन केला जाणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. पाली येथील बुद्धविहारसाठी देखील ३ गुंठे जागा दिली आहे, असेही सांगितले.