For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्रिकेटमधील क्लिष्ट नियमांना नारळ द्या!

06:19 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्रिकेटमधील क्लिष्ट नियमांना नारळ द्या
Advertisement

पूर्वीच्या काळात काही नियम हे क्रिकेटपटूंना अनभिज्ञ होते. उदाहरण द्यायचं झालं तर हँडलिंग द बॉल. 1985/86 मध्ये विंडीजचा संघ भारतात आला होता. त्यावेळी गॉर्डन ग्रीनिज आणि डेस्मंड हेन्स यांची जोडी फुटत नव्हती. जवळपास सहा साडेसहा तास या दोघांनी नेटाने किल्ला लढवला. शेवटी नशिबाने भारताला साथ दिली. डेस्मंड हेन्सने एक चेंडू हलकाच खेळून काढला. अर्थात तो चेंडू यष्ट्यांवर येत होता. तो चेंडू बॅटने अडवण्याऐवजी त्याने हाताने अडवला. भारतीय क्षेत्ररक्षकांनी अपील केल्यानंतर हेन्सला ‘हँडलिंग द बॉल’ (चेंडू हाताळणे) या नियमाखाली तो बाद झाला. हिटविकेटचा विचार केला (स्वयंचित) तर फार पूर्वी मोहिंदर अमरनाथ बऱ्याच वेळा असा आऊट झालाय. हुक करण्याच्या नादात तो ब्रयाच वेळा यष्ट्यांवर आदळलाय. त्यानंतर विनू मंकडने 1947 मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियन फलंदाज बिल ब्राऊनला नॉनस्ट्रायकर एंडला गोलंदाजी करताना धावबाद केले. (मंकड विकेट) कधी कधी काही फलंदाज ‘हिट द टोज’ही बाद झाले आहेत. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत तर आउट फॉर लेट कमिंग म्हणून श्रीलंकेचा फलंदाज बाद झाला होता. या वरील नियमांमध्ये खेळाडूंनी खिलाडुवृत्ती दाखवली पाहिजे, असे काही तज्ञांचे मत आहे. असो. जसजसं क्रिकेट प्रगल्भ होऊ लागलं तसतसं पुस्तकातील नियम मैदानावर दिसू लागले. अर्थात हे नियम आत्ताच आलेत का तर मुळीच नाही. परंतु आज काल प्रत्येक संघ क्रिकेटच्या डिक्शनरीमधील प्रत्येक नियम आजमावून पाहतोय. आणि त्यात त्यांना यशही येतय.

Advertisement

हे नियम होते 1992 पूर्वी. अर्थात आजही ते अमलात येतात म्हणा. परंतु तिसऱ्या पंचांचा प्रवेश झाला आणि सर्व कसे काटेकोरपणे होऊ लागलं. परंतु या सर्वांमध्ये आयसीसीचे काही नियम फारच क्लिष्ट, काहीसे न पटणारे किंबहुना काही संघांचे होत्याचं नव्हतं करणारे आहेत. गंमत बघा, कालपरवा बांगलादेश एका विचित्र नियमाने पराभूत झाला. बांगलादेश विऊद्ध दक्षिण आफ्रिका  सामन्यात 113 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा 18 व्या षटकात मेहमुदुल्ला फलंदाजी करत होता. चेंडू त्याच्या पॅडवर आदळला आणि चेंडू थेट फाईनलेग सीमारेषेबाहेर चौकारासाठी गेला. परंतु या दरम्यान गोलंदाजांनी पायचीतसाठी दाद मागितली. अर्थात ही दाद पंचांनी उचलून धरली. परंतु मेहमुदुल्लाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. ही दाद तिसऱ्या पंचानी उचलून धरली आणि फलंदाज नाबाद ठरला. तुम्ही तर म्हणाल, चेंडू तर सीमापार गेलाय, चार धावा त्या संघाला मिळाल्याच पाहिजेत. परंतु नाही मित्रांनो, इथेच तर नियमांची गोची होते. एकदा का पंचाने फलंदाजांना बाद दिले कि चेंडू आपोआप ‘डेड’ होतो. फलंदाज नाबाद राहिला खरा, परंतु त्याला मात्र चार धावा मिळणार नाहीत. आणि गंमत बघा, या चार धावांनीच बांगलादेशचा पराभव झाला होता.

जर हाच सामना उपांत्य फेरीचा किंवा अंतिम फेरीचा असला असता तर आणि वरील घटना घडली असती तर संघावर कुठली परिस्थिती ओढवली असती, याचा विचार न केलेलाच बरा. मध्यंतरी अंपायर्स कॉलवरून खूप मोठा वादंग उठला होता. परंतु काल जी घटना बांगलादेश विऊद्ध आफ्रिका सामन्यात घडली, तीही टी-20 सारख्या विश्वचषक स्पर्धेच्या लीग सामन्यात ही निश्चितच चिंतेची बाब आहे. आयसीसीने यासारख्या क्लिष्ट नियमांना नारळ द्यायलाच पाहिजे. असे कित्येक नियम वगळा, अशी वारंवार आयसीसीकडे मागणी करून सुद्धा आयसीसी धृतराष्ट्राची भूमिका वठवताना दिसतेय. असो.

Advertisement

हीच गोष्ट भारताच्या बाबतीत घडली असती तर.... नुसता विचार करून बघा अंगावर काटे येतील. आज हे बांगलादेशविऊद्ध घडलेय. उद्या ते दुसऱ्या कुठल्याही देशाशी घडेल. यावर मात्र भारतीय दिग्गज खेळाडूंनी नाराजी दर्शवली. अशा नियमांमुळे ऐन मोक्याच्या क्षणी जर पराभव झाला तर तो त्या देशाचा क्रिकेटसाठी काळा दिवस असेल एवढं मात्र खरं. आशा करूया की भविष्यात आयसीसी अशा या किचकट नियमाबद्दल फेरविचार करून नियमात बदल घडवून आणेल, एवढीच आपण माफक अपेक्षा करू शकतो.

Advertisement
Tags :

.