For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अठरा पगड एक व्हावेत!

06:39 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अठरा पगड एक व्हावेत
Advertisement

साताऱ्यातील 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्यविश्वात नवीन उत्साह निर्माण केला असला तरी, अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या भाषणातील एका विशिष्ट उल्लेखाने वैचारिक चर्चेला नवे वळण दिले आहे.  अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीला पाटील आणि कुलकर्णी यांच्या एकीकरणाबद्दल केलेले विधान हे संमेलनाच्या शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मराठी साहित्याच्या वैचारिक दिशेला प्रश्नचिन्ह उभे करणारे ठरले. अध्यक्ष विश्वास पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पाटील आणि कुलकर्णी यांच्या एकीकरणाचा उल्लेख करून “एका गावाला सुधारायचे असेल तर पाटील आणि कुलकर्णी एकत्र येणे आवश्यक” असे म्हटले. हे विधान विनोदी स्वरूपात असले तरी, ते महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या संदर्भात अतिशय संवेदनशील आहे. महाराष्ट्र उभा राहिला तो इथल्या सर्वजातीय तसेच 18 पगड जातीतील आणि अलूतेदार, बलुतेदार, सर्वसामान्यांच्या कष्टातून, त्यागातून. शिवरायांच्या स्वराज्याने समाजास जसे एकसंघ बनवले, तसेच वैचारिक मशागत केली ती इथल्या सर्व संतांच्या शिकवणुकीने. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, चोखोबा, सावता माळी, जनाबाई, बहिणाबाई अशा संतांनी. ही सर्व जातींच्या एकीची आणि वैचारिकतेची फळे आहेत की महाराष्ट्र हा नेहमीच प्रागतिक विचारांचा राहिला आहे. अशा काळात जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ‘पाटील आणि कुलकर्णी’ यांच्या एकीचे गुणगान करतात, तेव्हा शंभरीला पोहोचलेल्या या संमेलनाचे उद्याचे एखादे अध्यक्ष वर्णव्यवस्थेचे समर्थन करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये. ज्यांना ‘पानिपत’सारखी कालजयी कादंबरी लिहिण्याचे धैर्य आहे, त्यांनी अशा पांगेऱ्यात गुंतणे योग्य नव्हते. पाटील यांच्या या विधानातून त्यांच्या पाटीलकीला राजेशाहीची चकाकी अद्याप लोकशाहीच्या पूर्ण अर्थाने आत्मसात झालेली नाही, हेच दिसून येते. विद्रोही आणि अन्य चळवळी उभ्या राहतात त्या अशा विचारांच्या आणि मानसिकतेच्या तिटकाऱ्यामुळेच. नाहीतर त्या मराठी नावाच्या एका सशक्त रथाच्या दोन चाकांप्रमाणे धावल्या असत्या. आवश्यक तेथे त्यांनी एकसारखी वळणे घेतली असती आणि मराठी समाजाने एक गती कायम राखली असती. आज साहित्याच्या या दोन प्रवाहांना आलेले साचलेपण केवळ आणि केवळ त्यांच्यातील प्रवाही विचारांना मारल्याचे प्रतीक आहे. कोणालाही कोणाचे मोठेपण मान्य नाही आणि कोणाला वास्तवाशी भिडून दुसऱ्याच्या विचारांना समजून घ्यायचे नाही. म्हणूनच जेव्हा कधी मध्ययुगाचा विचार मांडला जातो तेव्हा त्या काळातील साहित्य आजही लोकांच्या ओठावर का आहे? त्याची अभंगवाणी का बनली आहे याचा विचार व्हायला हवा. खऱ्याखुऱ्या मराठी साहित्याचा कणा हा महाराष्ट्रातील संतांच्या विचारांवर घडला आहे. तो कोणाची नक्कल नाही की अनुवादही नाही. त्यामुळे त्याच विचारांवर इथला समाज बांधला गेला. आज या समाजाची जी विस्कळीत अवस्था झाली आहे, त्याला पुन्हा एकत्र बांधायचे असेल तर पाटील-कुलकर्णींचे गुणगान नव्हे, तर सर्व जातीय कर्तृत्वानांचे जयगान करणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाने ही चूक सुधारावी. साताऱ्याचे हे चौथे संमेलन (1905, 1962, 1993 नंतर) असले तरी यंदाचे संमेलन विशेष होते. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे संमेलनात भाषेच्या संवर्धनासाठी नव्या संकल्पना चर्चिल्या गेल्या. पण सातारा म्हणजे फक्त कंदी पेढे नाहीत. या कंदींचे नाव जगाला माहीत असले तरी सातारा परिसरातल्या दरी-डोंगरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पशुपालन करून निर्माण केलेल्या अतिरिक्त दुधातून जो चविष्ट पेढा तयार झाला, तो या मातीची खासियत आहे. पाटलांनी कंदी पेढा रिचवला खरा, पण त्यांच्याप्रमाणेच दऱ्या-डोंगरातून येणाऱ्या सर्वसामान्य, सर्व जातीय शेतकऱ्यांना त्यांनी तितका मान दिला असे वाटले नाही. त्या मागचे श्रम आणि पूर्वपिठिका विसरता येत नाही. 99वे संमेलन हे शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या मराठी साहित्याचे आत्मपरीक्षण आणि नव्या दिशेची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे मतभेद असले तरी विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेले हे संमेलन यशस्वी झाले याचे श्रेय आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखा, मावळा फौंडेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या टीमला जाते. साहित्य ही समाजाची कास आहे. ती मजबूत राहिली तर समाज मजबूत राहील. साताऱ्यातील हे संमेलन तेच सांगून गेले. स्वराज्याची राजधानी असलेल्या या ऐतिहासिक नगरीत 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत शाहू स्टेडियममध्ये पार पडलेले हे संमेलन केवळ साहित्यिक मेळावाच नव्हे, तर मराठी भाषा, संस्कृती आणि सामाजिक अस्मितेच्या पुर्नजागरणाचे भव्य प्रतीक ठरले. संमेलनाचा प्रारंभ भव्य ग्रंथदिंडीने झाला. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, भारताचे संविधान यांसह पाटील यांचे ‘महासम्राट’ आणि मागील अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे ‘सीतायन’ हे ग्रंथ पालखीतून नेण्यात आले. ही दिंडी सांगते की, मराठी साहित्य केवळ शब्दांचा खेळ नव्हे, तर एक सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक स्मृती आहे. उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “साहित्यात राजकारण येऊ नये. मराठी ही राज्यातील अनिवार्य भाषा राहील.” उद्घाटक ज्येष्ठ लेखिका डॉ. मृदुला गर्ग यांच्या उपस्थितीने संमेलनाला राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली. या संमेलनाचे वैशिष्ट्या म्हणजे प्रथमच सर्व माजी अध्यक्ष, सरस्वती सन्मान प्राप्त लेखक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांना निमंत्रित करणे. कवीसंमेलन, ग्रंथप्रदर्शन, कार्यशाळा, कोमलसंमेलन अशा कार्यक्रमांनी साहित्यरसिकांना चार दिवस साहित्यमय अनुभव दिला. मराठीला शतकानुशतके टिकवणारी ही परंपरा पुढेही अखंड चालू राहो, पण त्यात जातीय दर्प नव्हे तर एकीचा सुगंधी दरवळ असावा हीच अपेक्षा. मग त्या सर्वांनी एक होऊन पाटील, कुलकर्ण्यांसोबत अत्तराचे दिवे लावले तरी हरकत नाही!

Advertisement

Advertisement
Tags :

.