कृषी महाविद्यालयात आधुनिक शेतीचे धडे
कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
राजर्षी शाहू महाराज छत्रपती कृषी महाविद्यालय शंभर टक्के अनुदानित आहे. या कृषी महाविद्यालयाने अनेक आयएएस अधिकारीही दिले. एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास याच कृषी महाविद्यालयातील अभ्यासक्रमातून पुर्ण होतो. त्यामुळे बारावीनंतर जास्तीत जास्त विद्यार्थी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेणे पसंद करतात. विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे मिळत असून पुढील जीवनात हे शिक्षण फायदेशीर ठरत आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयात गेले की किमान पन्नास टक्के अधिकारी कृषी महाविद्यालयात शिक्षण घेवून आलेले असतात. एमपीएससी आणि युपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर कृषी महाविद्यालयात प्रवेश घ्या असाच सल्ला अनेक शिक्षण तज्ञ देतात. म्हणूनच या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सेल्फ स्टडीबरोबर मार्गदर्शनालाही तितकेच महत्व असते. त्यामुळे 100 टक्के शिक्षक भरती आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना शेतीमध्ये प्रात्यक्षिक करून व्यवसायिकता वाढीचे प्रशिक्षण दिले जाते. म्हशी पाळणे, दुध काढणे ते त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवले जातात. येथील शेतीत पिकणाऱ्या फळांवर प्रक्रिया करून विविध ज्युस तयार केले जातात. शेतीतील फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांची विक्री कशी करायची याचेही प्रत्यक्ष शिक्षण दिले जाते. कृषी महाविद्यालयातील हळद घेण्यासाठी तर जिल्ह्यासह बाहेरील लोकही येतात. प्रॉडक्ट विक्रीचा उपक्रम इतका स्तुत्य झाला आहे की ऑनलाईनही उत्पादने मागवले जातात. यामुळे महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी यशस्वी प्रगतशिल शेतकरी बनत आहेत. येथील नर्सरीही तितकीच महत्वाची मानली जाते, येथील नर्सरीतील रोपांना मोठी मागणी आहे. कृषी महाविद्यालयात शेतातील लागवडीपासून ते नर्सरीत कशा पध्दतीने रोपांचे संगोपन करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.कृषी महाविद्यालयातील मोसंबी, चिकु, कैरीचे पन्हे महाविद्यालयासमोरील रस्त्यावर विकले जात असून विक्री व्यवसायाचा अनुभव विद्यार्थ्यांना येत आहे.
- केशरी आंब्याला मागणी
कृषी महाविद्यालयात सेंद्रीय पध्दतीने आंबा पिकवला जातो. त्यामुळे येथील आंब्याला चांगली मागणी आहे. येथील केशरी आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आंब्याच्या विक्रीतून महाविद्यालयाला लाखो रूपये उत्पन्न मिळते.
- प्रात्यक्षिकाला महत्व
कृषी महाविद्यालयात अध्यापनाबरोबर प्रात्यक्षिकालाही महत्व दिले जाते. त्यामुळे 50 टक्के थेरी व 50 टक्के प्रात्यक्षिक शिकवली जातात. यातूनच शेतीशी निगडीत यंत्रसामुग्री तयार करणे, बि-बियाणांची वाणं तयार करणे, शेतीत नवनवीन प्रयोग करण्याला महत्व दिले जाते. सध्या मिलेटला महत्व असल्याने वरी, नाचणीही पिकवली जातेय. यातूनच विद्यार्थी प्रगतशिल शेतकरी बनत आहेत.
- यंदा शेतीत एआय तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण
कृषी पदवीच्या अभ्यासक्रमात हंगामी बीज उत्पादन व त्यावर प्रक्रिया करण्याचे शिक्षण दिले जाते. फळांच्या झाडांना कलम करणे, सेंद्रीय पध्दतीने भाजी-पाला पिकवण्याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. हरीतगृहातील संरक्षित शेती, गोठा व्यवस्थापन शिकवले जाते. यंदा महाविद्यालयातील कृषी व उद्यान विद्या विभागात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करायची याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
-डॉ. अशोककुमार पिसाळ, सहयोगी अधिष्ठाता, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.