Satara : जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे बिबट्याचा थरार
पाचवडजवळ बिबट्याचा वावर
पाचवड : जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथे शेती ते म्हसवे या जाणाऱ्या रस्त्यावर चव्हाण वस्ती व शिर्के वस्तीनजीक तलावाशेजारी बिबट्याचा थरार पाहावयास मिळाला. त्यामुळे शेतकरी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वडाचे म्हसवे रस्ता शेते सोमर्डी या रस्त्याला गावातून जोडला गेला आहे. गावाच्या बाहेरच याच रस्त्यालगत चव्हाण वस्ती व शिर्के वस्ती आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी व एक मोठा पाण्याचा तलाव आहे. या ठिकाणी गुरुवार १ जानेवारी रोजी काही शेळ्या-मेंढ्यांना व कुत्र्यांना खाल्ल्याचे दिसून आले आहे. तसेच तलावालगत व शेतामध्ये बिबट्याच्यापायाचे ठसेही दिसून आले आहेत. येथील ग्रामस्थांनी फोन करूनही वन विभागाचे कर्मचारी आले नाहीत. त्यानंतर येथे राहणारे रहिवासी, उबाठा युवा सेना जिल्हाध्यक्ष महेश संभाजी शिर्के यांनीही वन विभागाचे अधिकारी विनायक लाडे यांना बिबट्याची माहिती दिली.
परंतु त्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर महेश शिर्के यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून वनविभागाच्या कारभाराविषयी माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी मृत शेळ्या-मेंढ्या व कुत्र्याचे पंचनामे केले. मंत्रिमहोदयांचे पत्र असेल तरच इथे पिंजरे व कॅमेरे लावण्यात येतील, असे सांगितले.