For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागेनहट्टी-यरमाळ शिवारात बिबट्याचा वावर

12:08 PM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागेनहट्टी यरमाळ शिवारात बिबट्याचा वावर
Advertisement

शेतकऱ्यांमध्ये घबराट : वनविभागाने दखल घ्यावी

Advertisement

बेळगाव : नागेनहट्टी-यरमाळ शिवारांच्या मध्यामध्ये मागील दोन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. यामुळे परिसरात घबराट पसरली असून मंगळवारी वन विभागालाही याची माहिती कळविण्यात आली. शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून वनविभागाने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. सोमवारी सकाळी शेतामध्ये गेलेल्या काही शेतकऱ्यांना बिबट्यासदृश प्राण्याची हालचाल दिसली. सुरुवातीला कोल्हा असावा म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले. परंतु इतर शेतकऱ्यांनाही बिबट्या निदर्शनास आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतामध्ये काम करणाऱ्या महिलावर्गाने भीतीपोटी घर गाठले. यरमाळ गावच्या उतारापासून नागेनहट्टी शिवारापर्यंत बिबट्याच्या पायांचे ठसे उमटल्याचे निदर्शनास आले आहे. मंगळवारी सकाळीदेखील काही शेतकऱ्यांच्या नजरेस बिबट्या दिसून आला. मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र कैद करण्यात आले. परंतु अंतर दूर असल्यामुळे ते तितकेसे स्पष्टपणे दिसून आले नाही. परिसरातील नागरिकांनी मंगळवारी वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. आपण घटनास्थळी भेट देऊ असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याशिवारात पहिल्यांदाच बिबट्याचा वावर दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र कमालीची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतात काम करणाऱ्या शेतकरीवर्गाला जीव मुठीत घेऊन कामे करावी लागत आहेत.

मोरांच्या ओरडण्याचा आवाज कमी 

Advertisement

यरमाळ व नागेनहट्टी शिवारामधील भागाला कणवी म्हणून ओळखले जाते. या भागात पाण्याचे झरे असल्यामुळे मागील काही वर्षांपासून मोरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील दोन दिवसांत मोरांच्या ओरडण्याचा आवाज कमी झाल्याचेही शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.