म्हासुर्लीसह धामणी खोऱ्यात बिबट्याचा वावर ! शेतकऱ्यांना दर्शन, जनावारांची शिकार
रात्री शेत रक्षण करताना दक्षता बाळगण्याचे आवाहन
म्हासुर्ली / वार्ताहर
राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यात विसरलेल्या धामणी खोऱ्यातील जंगल भागात बिबट्याचा वावर असण्याला वनविभागाने दुजोरा दिला असून शेतकऱ्यांनी शेत रक्षणासाठी व शेताची कामे करताना समूहांने जावे.तसेच दक्षता बाळगावी.असे आव्हान म्हासुर्ली वन परिमंडळ क्षेत्राचे वनपाल विश्वास पाटील यांनी केले आहे.
धामणी खोऱ्याचा दक्षिण भाग प्रामुख्याने राधानगरी दाजीपूर वन्यजीव अभयारण्या लगतच असून उर्वरीत डोंगररांगा वन विभागाच्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या असून मोठ्या प्रमाणात गवा रेड्यांच्या बरोबर इतर जंगली प्राण्यांचे अस्तित्व आहे.
एवढे घनदाट जंगल असूनही धामणी खोरा परिसरात गवा रेडे,रानडुकर,भेकर,माकड याच्या व्यतिरिक्त कोणताही दुसरा हिस्त्र प्राणी शेत शिवारात किंवा गावालगत आल्याच्या घटना दिसून येत नव्हत्या.मात्र गेल्या एक-दोन वर्षापासून पणुत्रे (ता.पन्हाळा), परिसरात बिबट्याने दहशत माजवत शेतातील पाळीव कुत्री फस्त केली होती. तर गेल्या महिन्यापूर्वी जर्गी - गारिवडे (ता.गगनबावडा) परिसरात ही बिबट्याचे दर्शन झाले होते.जर्गी धनगर वाडा येथे तर बिबट्याने कुत्री व काही पाळीव प्राणी फस्त केले होते.
गेल्या आठवड्यात म्हासुर्ली बाजारी धनगरवाडा येथे दारात बांधलेल्या एका रेड्याला ठार करून त्याचे डोके घेऊन बिबट्या प्रसार झाला होता.त्यानंतर रविवारी रात्री म्हासुर्ली येथील स्थानिक शेतकरी गव्यापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताकडे गेले असता त्यांना बिबट्याचे दर्शन झाले.म्हासुर्ली परिसरात गवा रेड्यांच्या दहशतीबरोबर बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांतून भिती व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर होत असल्याने वन विभाग सतर्क झाला आहे. बिबट्याच्या शोधासाठी अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आल्याची माहिती म्हासुर्ली वन परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील यांनी दिली.