Leopard Cub: पांढरा बिबट पाहिलाय का? रत्नागिरीत सापडले दु्र्मिळ पिल्लू
वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली
रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथे बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आले. बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून येण्याची ही महाराष्ट्रातील बहुधा पहिलीच वेळ असावी, असे वनविभागामार्फत सांगण्यात येत आहे. हे पिल्लू मादी बिबट्यासोबत पुन्हा रानात निघून गेले असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते. या पिल्लांचे डोळेदेखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली. मात्र, शेजारीच असणाऱ्या मादीच्या आक्रमक पवित्र्याने घाबरलेल्या कामगार मंडळींनी मोठ्या शिताफीने दूर पळण्यात धन्यता मानली.
वेगळी प्रजाती नाही
वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत त्या पिल्लांची आईसोबत पुनर्भेट झाली. बिबट्या मादीने पिल्लांना रानात दुसऱ्या ठिकाणी नेले होते. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅ प लावले आहेत. काही अभ्यासकांच्या मते, पांढरे पिल्लू ही काही वेगळी प्रजाती नाही. त्यांच्या शरीरात काही द्रव्यांची कमतरता निर्माण राहिल्याने असा रंग होतो. बिबट्यामध्ये ब्लॅक पँथरही असतो. तसेच जंगलातील सर्व बिबटे काही आपल्यासमोर येत नाहीत. पांढऱ्या वाघांप्रमाणे दुर्मीळ पांढरे बिबटेही जंगलात असू शकतात. दरम्यान, संगमेश्वरात आढळून आलेल्या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नसल्याचे वनविभागामार्फत सांगण्यात आले.