अल्लेहोळ-हडलगा भागात बिबट्याची दहशत : वनखात्याचे दुर्लक्ष
हेस्कॉमच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे धोका : बंदोबस्ताची मागणी
खानापूर : चापगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील अल्लेहोळ-हडलगा भागात बिबट्याने मोठी दहशत माजवली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या सावज शोधण्यासाठी भर रस्त्यावर तसेच लोक वस्तीत वावरत असल्याने येथील नागरिकात तसेच शेतकरी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे. सध्या ऊस, मिरची यासह इतर पिकाना पाणी पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकरी रात्री, अपरात्री शेताकडे जात आहेत. मात्र खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना बिबट्याच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे. वनखात्याने बिबट्याचा बंदोबस्त करावा तसेच हेस्कॉमने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या काही दिवसापासून हडलगा, अल्लेहोळ परिसरात बिबट्या रात्रीच्या सुमारास अनेकांना दृष्टीस पडला आहे. तसेच शेताकडे पाणी देण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीस पडला आहे. सध्या मिरची आणि ऊस पिकाची मशागत सुरू असून, पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री, अपरात्री शेताकडे जात आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची घरे शेतातच आहेत. मात्र रात्री सहानंतर वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतीवाडीत राहणाऱ्या शेतकऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी जीवमुठीत घेऊन आहेत.
वीजपुरवठा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा
वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत हेस्कॉमला वारंवार अर्ज विनंत्या करुनदेखील याची दखल घेण्यात आलेली नाही. रात्रीच्या वेळी किमान सिंगलफेस वीजपुरवठा ठेवण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जर हेस्कॉमने येत्या दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत न केल्यास हेस्कॉम कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा अल्लेहोळ परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.