Kolhapur News | करडवाडीत बिबट्यासदृश प्राण्याचा कुत्र्यावर हल्ला ; परिसरात भीतीचे वातावरण
करडवाडीत वन्यप्राण्याचा शिरकाव;
करडवाडी - करडवाडी येथील (ता. भुदरगड)येथे बुधवारी रात्री सुमारे १० च्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने अंगणातील कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. ही घटना गोरीचा माळ परिसरातील शेतात राहणारे संपत खतकर यांच्या घरच्या अंगणात घडली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री अचानक कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने घरातील सदस्य बाहेर आले असता बिबट्यासारखा प्राणी दिसला. आरडा-ओरडा केल्यानंतर काही क्षणातच त्या प्राण्याने कुत्र्याला सोडून पळ काढला. यावेळी कुत्रा जखमीहोऊन रक्तबंबाळ झाला.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पारदेवाडी व निष्णपकडे जाणारे मोटारसायकस्वार घाबरून काही काळ थांबून राहिले होते. यानंतर अजित खतकर, संपत खतकर, उत्तम खतकर, सुनील खतकर यांनी घटनास्थळी जाऊन त्या प्राण्याचा शोध घेतला असता अंधारातून बॅटरीच्या प्रकाशाने डोळे चमकल्याचे दिसून आले. वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन अंदाज घेतला व नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे आवाहन केले.
स्थानिक वन मजुरांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी अजित खतकर यांनी केली आहे.