For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाणूस-उसगांव येथे फासात अडकून बिबट्याचा मृत्यू

11:21 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
नाणूस उसगांव येथे फासात अडकून बिबट्याचा मृत्यू
Advertisement

फोंडा : नाणूस-उसगांव येथे खासगी बागायतीजवळ फासात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना काल गुरूवारी सकाळी उघडकीस आली. जंगली जनावरांसाठी लावण्यात आलेल्या केबल वायरच्या फासात अडकून पडल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वनखात्याने दिली. बिबट्या पूर्ण वाढ झालेला सुमारे 5 वर्षाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनखात्याच्या हद्दीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. नाणूस उसगांव येथील गावडे यांच्या बागायतीच्या संरक्षक कुंपणाला लागूनच केबलच्या सहाय्याने फास अडकविण्यात आला होता. त्यात तो जायबंदी झाला. सदर घटना पहाटे अडीच ते तीन वाजण्याचा दरम्यान घडल्याचा अंदाज वनखात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.

Advertisement

फासात अडकल्यानंतर जीव वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे घटनास्थळावर त्याने केलेल्या संघर्षाच्या खुणांवरुन दिसून येते. केबलचा फास त्याच्या दर्शनी भागात किंवा गळ्यात अडकल्यास तो काही क्षणात गतप्राण झाला असता. मात्र फास त्याच्या पोटाकडून पाठिमागच्या भागात अडकल्याने त्याने त्यातून सुटण्यासाठी केलेले संघर्षमय प्रयत्नही अपुरे पडल्याने तो मृत झाला. याप्रकरणी फोंडा वनखात्याच्या टिमने घटनास्थळी पंचनामा केला. बिबट्याचा मृतदेह शवचिकित्सा अहवालासाठी पशूवैद्यकीयांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती फोंड्याचे उपवनपाल जीस वर्किस यांनी दिली. याप्रकरणी बागायतदाराची जबानी नोंद करण्यात येणार आहे.

फेब्रु. 2024 रोजी पालवाडा येथे आढळलेला मृत बिबट्या  

Advertisement

16 फेब्रु. 2024 रोजी असाच नर बिबट्या पालवाडा उसगांव येथे मृत अवस्थेत सापडला होता. त्याच्या पायाची चारही नखे गायब झाली असल्याने नखे तस्करी टोळी या भागात सक्रीय असल्याचा संशय प्राणिमित्रांनी व्यक्त केला होता. कालच्या घटनेमुळे वन्य प्राण्यांच्या शिकारी होत असल्याचा संशय वन खात्याने वर्तविला असून वन परिसरात रात्रीची गस्त परिणामकारक करण्याचे संकेत दिले आहेत.

Advertisement
Tags :

.