विहिरीत पडून बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू
कासेगाव :
वाळवा तालुक्यातील भाटवडे येथील जोगीनिरा परिसरातील सुनिल चाळके यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्याला वाचविण्यात प्राणीमित्र व वनविभागास यश आले आहे. चाळके यांच्या विहिरीचे काम पूर्ण झालेले नसल्याने विहिरीभोवती भिंत नाही. त्यामुळे रात्रीच्या अंधारात मादी बिबट्याच्या मागून जाताना बछडे पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या बछड्यांचे वय दीड महिन्याचे असून विहिरीतील पाण्याची पातळी खाली असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. एकाने विहिरीमधील छोट्या दगडाचा आधार घेत आपला जीव वाचवला तर दुसऱ्याला कशाचाही आधार न मिळाल्याने दम लागून त्याचा मृत्यू झाला आहे.
नेहमीप्रमाणे चाळके हे सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना विहिरीतून आवाज मांजराच्या ओरडण्याच्या आवाजासारखा आवाज ऐकू आला. त्यांनी विहिरीत डोकावून पहिले असता मांजराच्या पिलासारखी पिल त्यांना दिसली. त्यांनी लगेचच गावातील प्राणीमित्र गणेश निकम यांना कळवले. वनविभागाला एक बछडा मृतावस्थेत तर एक जिवंत आढळला. बचावलेल्या बछड्यास मादी बिबट्या घेऊन गेल्याचे कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे. भाटवडेबरोबरच या परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.