For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Bibtya Halla : कारिवडे येथे बिबट्याचा दोन शेतकऱ्यांवर हल्ला

09:24 AM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
bibtya halla   कारिवडे येथे बिबट्याचा दोन शेतकऱ्यांवर हल्ला
Advertisement
                                                      बिबट्याच्या हल्ल्यात एक म्हैसही जखमी 
Advertisement

पाटगाव : भुदरगड तालुक्यातील कारिवडे येथे भरदिवसा बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात पांडुरंग शंकर देसाई (वय ६०) हे गंभीर जखमी झाले असून, यशवंत शिवा देसाई (वय ७५) हे किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एक म्हैसही जखमी झाली आहे.

या घटनेमुळे कारिवडे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी, कारिवडे येथील पांडुरंग शंकर देसाई आणि यशवंत शिवा देसाई हे सोमवारी सकाळी सुमारे १० च्या सुमारास मळी परिसरातील शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते.
दुपारी सुमारे १२ च्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक म्हशीवर झडप घातली त्यावेळी तेथे असलेले पांडुरंग देसाई व यशवंत देसाई यांनी म्हशीला वाचवण्याच्या नादात बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला पण बिबट्याने या दोघांवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे दोघांचीही मोठी धावपळ उडाली.

यावेळी यशवंत देसाई यांनी प्रसंगावधान राखत कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, पांडुरंग देसाई यांच्यावर बिबट्याने जोरदार हल्ला चढविला. या हल्ल्यात पांडुरंग देसाई यांच्या कानाला, उजव्या हाताला तसेच तोंडावर गंभीर जखमा झाल्या. बिबट्याच्या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाले. त्याचबरोबर जवळील एका म्हशीवरही बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली आहे.
Advertisement

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग देसाई यांना तातडीने गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवले.