सासोलीत पडवीत बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला
दोडामार्ग - वार्ताहर
सासोली गावचे उपसरपंच अनिरुद्ध उर्फ वैभव फाटक यांच्या घरातील मागच्या पडवीत बांधण्यात आलेल्या कुत्र्यावर एका बिबट्याने हल्ला करण्याची घटना काल शुक्रवार रात्री घडली. बिबट्याचा वावर सासोली परिसरात असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. अधिक माहिती अशी की वैभव फाटक आपल्या मित्रासमवेत घरात टीव्ही पहात बसले होते. त्यांनी आपल्या कुत्र्याला घराच्या मागच्या बाजूस असलेल्या पडवीत बांधून ठेवले होते.रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना कुत्र्याचा विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यांनी पाठीमागे धाव घेतली असता एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याचे पहावयास मिळाले. तेव्हा श्री. फाटक व अन्य देखील भयभीत झाले. तर त्यांची चाहूल लागल्याने बिबट्याने कुत्र्याला सोडून दिले व नदीच्या दिशेने जंगलात तो पळून गेला. बिबट्याने केलेले हल्ल्यात कुत्र्याच्या मानेला दुखापत झाली आहे. कुत्र्यावर सध्या उपचार सुरू असून बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा बालंबाल बचावला आहे. दरम्यान या प्रकाराने सासोली गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.