लेन्सकार्टचा येणार आयपीओ, 1 अब्ज डॉलर्स उभारणार
नवी दिल्ली : डोळ्याच्या चष्म्यासह विविध उत्पादनांची विक्री करणाऱ्या लेन्सकार्ट यांचा आयपीओ लवकरच शेअरबाजारात येणार आहे. यासंदर्भातल्या तयारीला कंपनीने वेग दिला आहे, अशी माहिती मिळते आहे. आयपीओ सादरीकरणापूर्वी ही कंपनी आता पब्लिक लिमिटेड म्हणजेच सार्वजनिक बनली आहे. चष्मा विक्री करणारी ही कंपनी रिटेलर गटामध्ये होती. लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड असे आता नव्याने नाव कंपनीचे झाले आहे. यापूर्वी लेन्स कार्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड असे कंपनीचे नाव होते.
सेबीकडे लवकरच करणार अर्ज
लेन्सकार्ट येत्या काळामध्ये आपला आयपीओ सादर करणार असून 1 अब्ज डॉलर्सची उभारणी या अंतर्गत केली जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सेबीकडे लवकरच दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुग्राममध्ये या कंपनीचे मुख्यालय असून मागच्या वर्षी जूनमध्ये या कंपनीचे मूल्य पाच अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते.
यांचीही गुंतवणूक
सिंगापूरची सॉवरेन बाँड फंड टीमसेक आणि अमेरिकेतील वित्त संस्था फिडेलिटी यांचीही गुंतवणूक या कंपनीमध्ये आहे. जून 2024 नंतर महिन्याभरातच संस्थापक पियुष बंसल, नेहा बंसल, अमित चौधरी आणि सुमित कपाही यांनी जवळपास 20दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक कंपनीमध्ये केली आहे. कंपनी दरवर्षी 25 दशलक्ष फ्रेम्सची आणि 30 ते 40 दशलक्ष लेन्सची निर्मिती करते. भारतामध्ये 2500 हून अधिक स्टोअर्स असून दक्षिण आशियातही विस्तार आहे.