लेन्स कार्ट आयपीओ 31 रोजी होणार खुला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चष्म्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लेन्स कार्ट या कंपनीचा आयपीओ 31 ऑक्टोबर रोजी गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने शेअरबाजाराला दिली आहे. गुंतवणूकदार यामध्ये 4 नोव्हेंबरपर्यंत बोली लावू शकतात.
किती रक्कमेचा आयपीओ
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 7278 कोटी रुपये उभारणार आहे. यात 2150 कोटी रुपयांचे ताजे समभाग सादर केले जातील. यापूर्वी 4 ऑक्टोबर रोजी सेबीने लेन्सकार्टला आयपीओसाठी परवानगी दिली होती. ताजे समभाग आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत कंपनी समभाग विक्रीकरता उपलब्ध करणार आहे. जवळपास 13.22 कोटी रुपयांचे समभाग प्रवर्तक यायोगे विक्री करतील. यामध्ये पियुष बंसल, नेहा बंसल, अमित चौधरी यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
रक्कमेचा उपयोग
कंपनी या आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या रकमेचा वापर व्यवसायाला मजबुती देण्याकरता करणार आहे. 272 कोटी रुपयांचा खर्च हा नवी स्टोअर्स सुरु करण्याकरता केला जाईल.
हे आहेत लीड मॅनेजर
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अवेंडस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड व इन्टेन्सिव्ह फिस्कल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या आयपीओमध्ये लीड मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.